दहा उपनगरीय रेल्वेस्थानकांत डिसेंबरपासून सेवा कार्यान्वित

प्रवाशांच्या सोयीसाठी क्रिसकडून (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम) दिल्या जाणाऱ्या मोबाईल तिकीट सेवेत आणखी बदल केले जाणार असून या अंतर्गत लवकरच प्रवाशांना भ्रमणध्वनीवरील ‘अल्फा न्युमरिक’ संदेश स्कॅन करताच रेल्वे प्रवासाचे तिकीट उपलब्ध होणार आहे. डिसेंबरपासून ही सुविधा मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दहा स्थानकात सुरु करण्यात येणार असल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यामुळे स्मार्ट फोनवर काढलेल्या तिकीटाची छापील प्रत स्थानकात बसविण्यात येणाऱ्या यंत्रावर ‘अल्फा न्युमरिक’ संदेश स्कॅन करून त्वरित मिळविणे शक्य होईल. त्यामुळे तिकीटासाठी रांगेत ताटकळत उभे राहणे टळणार आहे. प्रथम हे सेवा स्मार्ट फोनवर उपलब्ध होईल. त्यानंतर साध्या भ्रमणध्वनीवरही स्कॅन करुन तिकीट देण्याची सुविधा सुरु केली जाणार आहे.

साधारण दोन वर्षांपूर्वी पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर भ्रमणध्वनीच्या माध्यमातून तिकीट सुविधा सुरु करण्यात आली. स्मार्ट फोनवर तिकीट काढताच स्थानकात असणाऱ्या एटीव्हीएम मशिनवर त्याची छापील प्रत घेता येत होती. मात्र अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने त्यात बदल करत पेपरलेस तिकीट सेवेचा पर्यायही देण्यात आला. त्यात सर्वात महत्त्वाचा अडथळा जीपीएसचा होता. तो पुढे सोडविण्यात आला. क्रिसकडून सुरु करण्यात आलेली ही तिकीट सुविधा आणखी विकसित केली जाईल. त्यानुसार मोबाईल स्कॅन करून तिकीटाची छापील प्रत देणारी नवीन यंत्रणा मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकावर बसविण्यात येणार आहेत.

सुविधा अशी

* मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रत्येकी पाच स्थानकांवर मिळून ५० भ्रमणध्वनी स्कॅनिंग यंत्रणा बसवण्यात येणार आहेत.

* पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट,  दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली आणि मध्य रेल्वेवरील सीएसएमटी, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली आणि कल्याण स्थानकात ही यंत्रणा बसविली जाईल.

* स्मार्ट फोनवर तिकीट आरक्षित केल्यानंतर एक ‘अल्फा न्युमरिक’ संदेश फोनवर येईल. हा संदेश संबंधित यंत्रावर स्कॅन करताच अवघ्या काही सेकंदात तिकीटाची छापील प्रत उपलब्ध होईल.

* प्रत्येक स्थानकात पाच यंत्रे बसविली जातील. त्याला मिळणाऱ्या प्रतिसादानंतरच अन्य स्थानकांत ही यंत्रणा बसविण्यात येणार आहेत.

प्रथम स्मार्ट फोनसाठी स्कॅन सुविधा उपलब्ध होईल. कालांतराने साध्या भ्रमणध्वनीसाठीही ही सुविधा उपलब्ध होईल. यंत्र बसविण्यासाठी स्थानके निश्चित करण्यात आली आहेत. मात्र ती नेमकी कुठे बसवायची, हे पश्चिम आणि मध्य रेल्वे निश्चित करणार आहे. 

– उदय बोभाटे, महाव्यवस्थापक, क्रिस