‘मुंबई रेल्वे’ म्हणून ‘बीबीसी २’ वाहिनीने बनवलेल्या अनुबोधपटापासून ते वरुण धवन चित्रपटात का होईना ‘बदलापूर’ स्थानकात उतरल्यावर त्याच्या मागे दिसणारा स्थानकाचा बोर्ड अशा प्रसंगांसाठी निर्मात्यांनी मध्य रेल्वेची वाट धरल्याने या वर्षी चित्रीकरणातून एक कोटी २३ लाख ५ हजार सहासष्ट रुपये एवढा महसूल रेल्वेला मिळवता आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी बुधवारी दिली. बॉलीवूडपटांमधून रेल्वे आणि पुरातन वास्तूंच्या यादीत असलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाच्या इमारतीचे सर्रास दर्शन होते. यापुढे त्यांची दृश्ये चित्रपटांतून वापरल्यास त्यावरही रॉयल्टी आकारण्याचा विचार सुरू असल्याचे पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
बॉलीवूडपट, मालिका आणि जाहिरातींच्या चित्रीकरणासाठी मध्य रेल्वेच्या अनेक स्थानक आणि तेथील परिसरांना निर्मात्यांची पसंती मिळू लागली आहे. या वर्षी प्रदर्शित झालेल्या अरबाझ खान निर्मित ‘डॉली की डोली’ चित्रपटाचे चित्रीकरण नाशिक रोड आणि देवळाली स्थानकात करण्यात आले आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित चित्रपटाच्या नावात ‘बदलापूर’ असले तरी प्रत्यक्षात या चित्रपटाचे चित्रीकरण लोणावळा, पुण्याजवळचे लोणी स्थानक आणि इगतपुरी रेल्वे स्थानकात करण्यात आले आहे. सलमान खानच्या ‘किक’चे चित्रीकरणही आपटा रेल्वे स्थानकात करण्यात आले असून सलमानच्या जवळपास प्रत्येक चित्रपटाचे चित्रीकरण पनवेल ते रोहा स्थानकांदरम्यान केले जाते, अशी माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली. या वर्षी केवळ चित्रीकरणामधून मध्य रेल्वेला एक कोटीच्या वर महसूल मिळाला असून हा आत्तापर्यंतचा सर्वाधिक महसूल असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. एकटय़ा ‘बीबीसी २’ या आंतरराष्ट्रीय वाहिनीने केलेल्या ‘मुंबई रेल्वे’ या अनुबोधपटाच्या चित्रीक रणातून ६२ लाख ८३ हजार रुपये एवढा महसूल रेल्वेला मिळाला आहे.चित्रपट निर्मात्यांना रेल्वे स्थानकावर चित्रीकरणासाठी लागणाऱ्या परवानग्या, लोकल ट्रेनमध्ये चित्रीकरण असेल किंवा स्थानक परिसरात चित्रीकरणासाठी किती मूल्य आकारले जाईल याची सगळी माहिती सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळात मिळावी, त्यांच्या गाडय़ांना पार्किंगसाठी जागा मिळावी, अशा काही त्यांच्या मागण्या असतात. या सगळ्या गरजा ताबडतोब पूर्ण करणे आणि सर्व परवानग्या एकाच कें द्रावर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेने प्रयत्न केले होते. परिणामी चित्रीकरणासाठी निर्मात्यांनी मध्य रेल्वेला पसंती दिली असल्याचे पाटील यांनी सांगितले. या वर्षी वाडी बंदर हे स्थानकही चित्रीकरणासाठी खुले करण्यात आले असून माझगाव परिसरातील रेल्वे यार्डही चित्रीकरणासाठी खुले करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.