मुंबई : मुंबईमधील ठिकठिकाणच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सवानिमित्त साकारलेले देखावे, रोषणाई पाहण्यासाठी आणि गणेश दर्शनासाठी भाविक गर्दी करू लागले असून भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने पाच दिवस, अनंत चतुर्दशीपर्यंत रात्री उशिरा रेल्वे गाडय़ा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर पश्चिम रेल्वेनेही अनंत चतुर्दशीच्या दिवशी मध्यरात्रीनंतरही लोकल सेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

सध्या गणेश दर्शनासाठी ठिकठिकाणी भाविकांची गर्दी होत आहे. तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गिरगाव चौपाटीवरील विसर्जन सोहळा पाहण्यासाठी उपनगरांमधून मोठय़ा संख्येने भाविक येत असतात. भाविकांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने अनंत चतुर्दशीपर्यंत रात्री उशिरापर्यंत लोकल सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पश्चिम रेल्वेच्या आठ जादा लोकल फेऱ्या

’ पश्चिम रेल्वेने २३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री आठ विशेष लोकल फेऱ्या चालविण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. चर्चगेट येथून मध्यरात्री १.१५ वाजता सुटणारी लोकल विरार येथे मध्यरात्री २.५० वाजता पोहोचेल.

’ चर्चगेट येथून दुसरी लोकल १.५५ वाजता सोडण्यात येणार असून ती ३.२२ वाजता विरार येथे पोहोचेल तर मध्यरात्री २.२५ वाजता चर्चगेट येथून सोडण्यात येणारी लोकल पहाटे ४.०२ वाजता विरारला पोहोचेल. चौथी लोकल चर्चगेट येथून मध्यरात्री ३.२० वाजता सुटेल आणि पहाटे ४.५८ वाजता विरार येथे पोहोचेल.

’ या लोकल सर्वच रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात येणार आहेत. परतीच्या मार्गावर विरार येथून मध्यरात्री १२.१५ वाजता सुटणारी लोकल चर्चगेट येथे मध्यरात्री १.५२ वाजता पोहोचेल. दुसरी लोकल मध्यरात्री १२.४५ वाजता सोडण्यात येणार असून ती मध्यरात्री २.२२ चर्चगेटला पोहोचेल.

’तिसरी लोकल विरारहून मध्यरात्री १.४० वाजता सुटेल आणि चर्चगेट येथे मध्यरात्री ३.१५ वाजता पोहोचेल. विरार येथून सोडण्यात येणारी चौथी लोकल चर्चगेट येथे पहाटे ४.४० वा. पोहोचेल.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान रात्री विशेष लोकलगाडय़ा सोडण्यात येणार आहेत. मंगळवार ते रविवार या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून रात्री १ वाजून ३० मिनिटांनी गणपती विशेष लोकल सोडण्यात येणार असून ती कल्याण येथे मध्यरात्री ३ वाजता पोहोचेल. ही लोकल धिम्या मार्गावरुन सोडण्यात येणार असून ती सर्व स्थानकांवर थांबेल, असे सूत्रांनी सांगितले.