विरार, कल्याणसारख्या स्थानकांवरील प्रवाशांची नेहमीच एक तक्रार असते ती म्हणजे या स्थानकांमधून सुटणाऱ्या लोकलमध्ये त्यांना बसण्यास जागा मिळत नाही. डाऊन येणाऱ्या प्रवाशांमुळे त्यांना संपूर्ण प्रवास उभा राहून करावा लागतो. याविरोधात अनेकदा काही प्रवाशांनी आंदोलनंही केली आहेत. मात्र तेवढ्यापुरती चर्चा झाली की पुन्हा काही दिवसांनी डाऊन प्रवास सुरु होतो आणि ती समस्या आहे तशीच राहते. पण आता मात्र अशा डाऊन येणाऱ्या प्रवाशांवर चाप बसणार आहे. कारण अशा प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. डाऊन प्रवास करताना दोषी अढळणाऱ्या प्रवाशांना दंड तसंच एक वर्ष कारावासाची शिक्षा होऊ शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, विरार, कल्याणसारख्या ज्या स्थानकांतून रेल्वे सुटणार आहे तिथे आरपीएफ जवानांना तैनात करण्यात येणार आहे. रेल्वे पोहोचल्यानंतर त्यात जर कोणी डाऊन आलेला प्रवासी असेल तर लगेच त्याला खाली उतरवून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सुरुवातीला संबंधित प्रवाशाला सूचना देऊन सोडण्यात येईल, पण दुसऱ्यांदा आढळल्यास त्यांच्याकडून दंड वसूल केला जाणार आहे. जर तिसऱ्यांदा पुन्हा तो प्रवासी सापडला तर मात्र एक वर्षांच्या कारावासाची शिक्षा केली जाईल.

किमान आमच्या स्थानकातून सुटणाऱ्या लोकलमध्ये तरी बसायला मिळालं पाहिजे अशी मागणी नेहमीच कल्याण, विरार स्थानकातील प्रवासी करताना दिसतात. सकाळच्या वेळी असणाऱ्या सर्व लोकल स्थानकात येतानाच इतक्या भरुन येतात की त्यात चढतानाही कसरत करावी लागते अशी तक्रार प्रवासी करत असतात. डाऊन येणाऱ्यांना काही बोलायला गेलं तर त्यांनी ग्रुप केलेले असतात जे उलट आपल्याच अंगावर येतात असंही काही प्रवासी सांगतात. वारंवार तक्रार करुनही दुर्लक्ष केलेल्या रेल्वेने आता मात्र हा प्रकार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

एकीकडे या निर्णयाचं स्वागत होत असून, डोंबिवली, नालासोपरासारख्या स्थानकांमधील प्रवाशांनी या निर्णयाचा विरोध केला आहे. आमच्या स्थानकांमधून सुटणाऱ्या लोकलमधूनही डाऊन प्रवासी भरुन येतात, त्यामुळे आमच्याकडे पर्याय नसल्यानेच उलट प्रवास करावा लागतो असा त्यांचा दावा आहे. मात्र रेल्वेने आपला निर्णय बदलणार नसल्याचं स्पष्ट केलं असून लवकरच निर्णयाची अंमलबजावणी केला जाईल असं सांगितलं आहे.

अत्यंत महत्त्वाचे– वाचकांनी आज १ एप्रिल असून आज एप्रिल फूल करण्याची प्रथा आहे हे विसरू नये ही नम्र विनंती