केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्र तसेच मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण क्षेत्रातील महानगरपालिका कर्मचाऱ्यांनाच उपनगरीय रेल्वे प्रवासाला राज्य शासनाने परवानगी दिली आहे. रिझव्र्ह बँक वगळता अन्य राष्ट्रीयीकृत व खासगी बँका, वित्तीय सेवा किंवा अन्य अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही रेल्वेचा वापर करता येणार नाही. मात्र, त्यांना खासगी वा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करता येईल. रिक्षा-टॅक्सीतून सर्वसामान्यांना प्रवास करता येणार नाही.

राज्यात गुरुवारी रात्रीपासून लागू झालेल्या कठोर निर्बंधांच्या पाश्र्वाभूमीवर कोणत्या क्षेत्रातील व्यक्तींना कसा प्रवास करता येईल, याबाबतचे स्पष्टीकरण राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने प्रसिद्ध केले. राज्य शासनाच्या १३ एप्रिलच्या आदेशात अत्यावश्यक सेवेत अनेक सेवांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु, या अत्यावश्यक सेवेतील सर्वांनाच मुंबईत उपनगरीय रेल्वेसेवेचा वापर करता येणार नाही. फक्त सरकारी कर्मचारी, आरोग्य सेवा, मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका, जिल्हा परिषद, सिडको, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, विविध आयोगाच्या कर्मचाऱ्यांनाच रेल्वेसेवेचा लाभ घेता येईल. राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनाही रेल्वे  प्रवासाला परवानगी देण्यात आलेली नाही. रेल्वे किं वा खासगी वाहनाने प्रवास करण्यास मुभा असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे करण्यात आले आहे.

रेल्वे नाही, पण वाहनाने प्रवास करा

अत्यावश्यक सेवा म्हणून सरकारने १३ एप्रिलच्या आदेशान्वये समाविष्ट के लेल्या सेवांमधील सर्वच घटकांना रेल्वेचा वापर करता येणार नाही. पण अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना खासगी वाहने किं वा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून कार्यालयात ये-जा करता येईल. रेल्वे नाही मग खासगी गाड्यांमधून प्रवास करा, असाच सल्ला राज्य सरकारने दिला आहे. खासगी वाहने रस्त्यावर आल्यावर पोलिसांकडून चौकशी केली जाईल. या निर्णयामुळे पुढील आठवडाभर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा प्रवास खडतर असेल. रिक्षा-टॅक्सीतून सर्वसामान्यांना प्रवास करता येणार नाही. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी किं वा वैद्यकीय सेवेसाठी रिक्षा-टॅक्सी वापरता येईल. म्हणजेच रिक्षा किं वा टॅक्सी चालकाने ओळखपत्र बघून प्रवाशांना प्रवेश द्यावा हे सरकारला बहुधा अभिप्रेत असावे, अशी टीका होऊ लागली. डॉक्टर्स, परिचारिका किं वा अन्य निमवैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना खासगी गाड्यांमधून प्रवास करता येईल.

अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखवल्यानंतरच तिकिट

मुंबई : राज्य सरकारने उपनगरीय रेल्वे प्रवासासाठीही निर्बंध लागू केले असून, सर्वसामान्यांना प्रवास करण्यास मनाई केली आहे. अत्यावश्यक सेवेतील आणि सरकारी ओळखपत्र असलेल्या कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. गेल्या वर्षी करोना संसर्ग वाढताच मुंबई उपनगरीय लोकल सेवा बंद ठेवण्यात आली होती. जून २०२० पासून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेसेवा पुन्हा सुरु झाली. त्यानंतर हळूहळू विविध श्रेणींतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. सामान्य प्रवाशांनाही मर्यादित वेळेत प्रवास करण्याची मुभा रेल्वेकडूनही देण्यात आली. त्यामुळे मध्य व पश्चिम रेल्वेवरील प्रतिदिन प्रवासी संख्या ३८ ते ३९ लाखांवर पोहोचली. परिणामी तिकीट खिडक्या, एटीव्हीएमसमोर, तसेच लोकल गाड्यांमध्येही गर्दी वाढली. यात प्रवासादरम्यान अंतरनियम, मुखपट्टी अशा करोना प्रतिबंधक उपाययोजनांकडेही दुर्लक्ष होत गेले. आता पुन्हा उपनगरीय रेल्वे प्रवासावर बंधने आली असून २२ एप्रिलच्या रात्री ८ वाजल्यापासून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची परवानगी देण्यात येत आहे.

रेल्वेफेऱ्यांच्या संख्येत घट

मध्य रेल्वेवर २०२० मध्ये टाळेबंदीआधी दररोज १,७७४ लोकल फे ऱ्या होत होत्या. टाळेबंदीत जून २०२० पासून लोकल सुरु करताना त्यांची संख्या काहीशी कमी ठेवण्यात आली. प्रवासी संख्या वाढताच ९५ टक्के  लोकल फे ऱ्या चालवण्यात आल्या. आता शुक्र वारपासून फक्त १ हजार ३९२ फे ऱ्या चालवण्यात येणार आहेत. फक्त अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सुरु राहणार असल्यानेच फे ऱ्यांची संख्याही मर्यादित ठेवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी  सांगितले. त्यानुसार रविवारच्या  वेळापत्रकाप्रमाणेच लोकल धावतील. शिवाय करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सीएसएमटी ते कल्याण वातानुकू लित सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेचेही मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकू र यांनी लोकल फे ऱ्यांची संख्या कमी करण्यात येणार असल्याची माहिती दिली. वातानुकू लित लोकलबाबतही निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोहमार्ग पोलीस सज्ज

रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वारांवर लोहमार्ग पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. मध्य व पश्चिम रेल्वेवर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या १,७०० ते १८०० लोहमार्ग पोलिसांपैकी काही पोलीस हे प्रवेशद्वारांवर तैनात असतील. प्रवाशाचे ओळखपत्र तपासणे व प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या अन्य प्रवाशांना रोखण्याचे काम ते करणार आहेत. रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वारांची संख्या कमी केली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मेट्रो

घाटकोपर ते अंधेरी ते वर्सोवा मेट्रोमधूनही अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मेट्रो सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत सुरु असेल, अशी माहिती मुंबई मेट्रो वनकडून देण्यात आली.

अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच मुंबईत प्रवेश

अत्यावश्यक सेवा आणि सरकारी कार्यालयीन कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त मुंबईबाहेरून येणाऱ्या अन्य नागरिकांना शहरात प्रवेश मिळणार नाही. पोलिसांकडून दहिसर, मुलुंड चेक नाक्यावर वाहनांची कठोर तपासणी केली जाणार असून, अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त अन्य वाहनांना परत पाठविले जाणार आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या नवीन नियमांनुसार नातलगाचे आजारपण अथवा अंत्यसंस्कारासाठीच दुसऱ्या जिल्ह्याात प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सामान्य नागरिकांच्या दुसऱ्या जिल्ह्याातील प्रवासावर बंधने घालण्यात आली आहेत. परिणामी मुंबईबाहेरून येणाऱ्यांना अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त मुंबईत प्रवेश करता येणार नाही.

निर्बंध काय?

 

* बँकांमध्ये १५ टक्के किंवा पाच कर्मचाऱ्यांनाच परवानगी

* आंतरजिल्हा प्रवासावर निर्बंध. वैद्यकीय कारणासाठी प्रवासास मुभा

* सरकारी कार्यालयांमध्ये अभ्यागतांना बंदी

* शाळा, महाविद्यालये पूर्णपणे बंद. शिक्षक किंवा अन्य कर्मचाऱ्यांच्या १५ टक्के उपस्थितीस परवानगी

* घरपोच सेवा रात्री ८ नंतरही सुरू ठेवायची की नाही, याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर

* वकिलांना रेल्वेने प्रवास करता येणार नाही. खासगी वाहनाने प्रवास करण्यास मुभा

* बाहेरगावच्या गाड्यांसाठी किंवा विमानतळावर जाण्यासाठी रिक्षा-टॅक्सीचा वापर करण्यास परवानगी

* जिल्ह्याबाहेरील प्रवासासाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही. मात्र, प्रवासाचे योग्य कारण असणे गरजेचे

* लग्न सोहळ्यात उपस्थित हॉलमधील कर्मचारी, कॅटरिंग सेवा पुरविणारे कर्मचारी यांना करोना नसल्याचा अहवाल बंधनकारक

ओळखपत्राशिवाय स्थानकात प्रवेशबंदी

रेल्वे स्थानकातील पूर्व व पश्चिमेकडील प्रत्येकी दोन ते तीनच प्रवेशद्वारे सुरू ठेवण्यात येतील. अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखवून तिकीट मिळेल. ओळखपत्र व तिकीट दाखवूनच स्थानकात प्रवेश मिळेल. स्थानकातील प्रवेशद्वारांजवळ लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ)बरोबरच तिकीट तपासनीसही तैनात असतील. मोजक्याच तिकिट खिडक्या सुरू राहतील. दोन रुपये जादा शुल्क आकारुन पुन्हा सुरु झालेली जनसाधारण तिकीट सेवा आणि यूटीएस अ‍ॅप मोबाइल सेवाही बंद ठेवण्यात (जेटीबीएस) येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.