सोनसाखळी चोरीचे प्रमाण जास्त; गतवर्षीच्या तुलनेत बलात्काराच्या घटनांत वाढ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुर्ला स्थानकात एका सोनसाखळी चोराच्या चोरीच्या प्रयत्नात गाडीखाली येऊन एका तरुणीचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर रेल्वे प्रवासादरम्यान आणि स्थानकांतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यातच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रेल्वे परिसरात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच या तरुणीचा मृत्यू ज्या कारणामुळे झाला होता, त्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्येही लक्षणीय वाढ दिसत आहे.

कुर्ला येथून गाडी पकडण्याच्या तयारीत असलेल्या सपना शुक्ला या तरुणीच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरताना सुभाशीष ऊर्फ रॅपी बैरागी चरण मलिक या तरुणाने तिला धक्का दिला होता. या धक्क्यामुळे ती फलाटावरून खाली पडली. दुर्दैवाने त्याच वेळी येणाऱ्या लोकलखाली येऊन तिचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. या घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत बलात्कारांच्या घटनांमध्ये तब्बल ५० टक्क्यांनी वाढ झाल्याचे आकडेवारीनुसार निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या अखेपर्यंत लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत बलात्काराच्या पाच घटना घडल्या होत्या. यंदा हे प्रमाण नोव्हेंबर अखेरीपर्यंत आठ घटनांवर आले आहे. त्याशिवाय गेल्या वर्षी सोनसाखळी चोरीच्या २४४ घटना वर्षभरात नोंदवण्यात आल्या होत्या. यात नोव्हेंबपर्यंत २२० घटनांचा समावेश होता. यंदा नोव्हेंबरअखेपर्यंत २९७ घटनांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे कुर्ला येथील तरुणीचा मृत्यूही सोनसाखळी चोरीच्या प्रयत्नातच झाला होता.

महिलांची छेड काढण्याच्या प्रकाराला गेल्या वर्षीच्या तुलनेत आळा बसला असून गेल्या वर्षी डिसेंबपर्यंत ८१ घटनांच्या तुलनेत यंदा ६९ घटना घडल्या. तर प्रवाशांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये यंदा वाढ झाली असून डिसेंबपर्यंत हा आकडा २१ एवढा होता. गेल्या वर्षी डिसेंबपर्यंत प्रवाशांवरील हल्ल्याच्या १७ घटनांची नोंद झाली होती. यापैकी बहुतांश हल्ले महिला प्रवाशांवरील होते.

महिला प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी लोहमार्ग पोलिसांकडून महिलांच्या डब्यांमध्ये रात्रीच्या वेळी हवालदारांची नियुक्ती केली जाते, पण लोहमार्ग पोलिसांचा रेल्वे स्थानकांवरील वावर अत्यंत नगण्य असतो. कुर्ला, ठाणे, डोंबिवली, अंधेरी, घाटकोपर, भायखळा आदी स्थानकांवर लोहमार्ग पोलीस क्वचित प्रवेशद्वारांजवळच दिसतात. यात लोहमार्ग पोलिसांची अनेक पदे रिक्त असल्याचा भाग असला, तरीही महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब गंभीर आहे.

त्याशिवाय सर्वच स्थानकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे पसरले असले, तरी प्रत्यक्ष गुन्हा रोखण्याच्या दृष्टीने हे कॅमेरे निरुपयोगी असल्याची भावना विविध प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी बोलून दाखवतात. गुन्हा घडून गेल्यानंतर केवळ गुन्ह्य़ाची उकल करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग होत असेल, तर त्याचा प्रवाशांना काय फायदा, असा प्रश्न उपनगरीय प्रवासी एकता संघाच्या नंदकुमार देशमुख यांनी उपस्थित केला.

याबाबत लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधला असता महिला सुरक्षेसाठी लवकरच एक धोरण आणले जाईल आणि रेल्वे सुरक्षा दलासह एकत्रितपणे महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार केले जाईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway unsafe for women
First published on: 09-12-2016 at 02:45 IST