उपनगरीय रेल्वेसाठी ‘पीक अवर’मध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळांमध्ये काही प्रमाणात बदल करावेत, याबाबत आग्रही असलेल्या मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी मध्य रेल्वेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी तरी हा बदल करण्याचे ठरवले आहे. मध्य रेल्वेच्या महिला सबलीकरण विभागाच्या ‘स्वयंसिद्धा’ या कार्यक्रमात बोलताना त्यांनी याबाबत भाष्य केले. महिला कर्मचाऱ्यांनी सकाळी नऊच्या ठोक्याला येण्याऐवजी सकाळी आठ ते दहा या वेळेत कधीही कार्यालयात यावे. मात्र कार्यालयात आल्यापासून आठ तास काम करूनच निघावे, असे त्यांनी सांगितले.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद पहिल्यापासूनच सरकारी कार्यालयांमधील वेळा बदलण्याबाबत आग्रही आहेत. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री, मुख्य सचिव आदींच्याही भेटी घेतल्या होत्या. मात्र राज्य सरकारी पातळीवर अद्याप त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. आता महाव्यवस्थापकांनी आपल्या अखत्यारित रेल्वेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी ही सवलत देऊ केली आहे.
सर्व सरकारी कार्यालयांतील सर्वच विभागांच्या कर्मचाऱ्यांना कार्यालय गाठण्यासाठी एकच वेळ असल्याने ‘पीक अवर’मध्ये गाडय़ांना प्रचंड गर्दी असते. यावर तोडगा म्हणून आता रेल्वेच्या महिला कर्मचारी सकाळी आठ ते दहा या वेळेत कधीही कार्यालयात येऊ शकतील. तसेच कार्यालयात आल्यानंतर आठ तास काम करून त्या निघू शकतील. त्यामुळे लवकर येणाऱ्या महिलांची गर्दीपासून सुटका होईल आणि परिणामी गर्दीच्या वेळी येणाऱ्या महिलांची संख्याही कमी होईल, असा उद्देश आहे. मात्र या वेळांची अमलबजावणी कधीपासून होणार, याबाबत काहीच स्पष्ट करण्यात आलेले नाही.