रेल्वे प्रशासन, कंत्राटदारांकडून सुरक्षेकडे दुर्लक्ष

पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव ते मालाडदरम्यान काम करून स्थानकात परतणाऱ्या रेल्वेतील तीन कंत्राटी महिला कामगारांना एक्स्प्रेसच्या धडकेत जीव गमवावा लागल्याची घटना शनिवारी घडली. यामुळे रेल्वे हद्दीत काम करणाऱ्या रेल्वे कामगार आणि कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न अधोरेखित झाला. अशा अनेक घटनांनंतरही सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना करण्याऐवजी रेल्वे चालढकल करीत असल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात गेल्या दहा वर्षांत ४६ तर मध्य रेल्वेवर प्रत्येक महिन्याला सरासरी एक याप्रमाणे रेल्वेच्या कायमस्वरूपी कामगार आणि कंत्राटी कामगारांचा अपघातात मृत्यू होत आहे. हे मृत्यूसत्र थांबणार कधी, असा सवाल कामगार संघटना करत आहेत.

गेल्या काही वर्षांत पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय रेल्वेवर बराच ताण वाढला आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार लोकल फेऱ्या आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांची संख्या प्रत्येक वर्षी वाढविण्यात येते. सध्याच्या घडीला तीन ते चार मिनिटाला एक याप्रमाणे लोकल धावत आहेत. वाढत असलेल्या लोकल फेऱ्यांमुळे रेल्वेला रुळावरील विविध कामे करण्यासाठी अपुरा वेळ पडतो. याचा परिणाम रेल्वे रुळावर काम करणाऱ्या रेल्वेच्या कायमस्वरूपी कामगार आणि कंत्राटी कामगारांवरही होत आहे. अपुरे मनुष्यबळ, वाढत गेलेला कामाचा व्याप आणि काम करताना सुरक्षेचा अभाव यामुळे कामगारांना अपघाताला सामोरे जावे लागते. शनिवारी मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकाजवळच झालेल्या अपघातानंतर सुरक्षेचा प्रश्न अधोरेखित झाला आहे.

रेल्वेमधील कायमस्वरूपी, तसेच कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे सरचिटणीस प्रवीण वाजपेयी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केली. लोकल आणि लांबपल्ल्याच्या गाडय़ा धावताना काम करणे कठीण होते, असेही ते म्हणाले. काम सुरू असलेल्या मार्गावर संपूर्ण मेगा ब्लॉक घेणे आवश्यक आहे. तसेच ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या जवळच्या रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या लोकल आणि लांबपल्ल्याच्या गाडय़ांसाठी वेगमर्यादा असली पाहिजे, या मागण्या आम्ही रेल्वे बोर्डाकडे केल्या आहेत. मात्र, अद्यापही निर्णय झाला नसल्याचे वाजपेयी म्हणाले.

मध्य रेल्वे मार्गावर सरासरी प्रत्येक महिन्याला एक याप्रमाणे कामगारांचे अपघात होत आहेत. यामध्ये कंत्राटी कामगारही आहेत. भारतीय रेल्वेत वर्षांला ४०० कामगारांचा मृत्यू रुळावर काम करताना किंवा रूळ ओलांडताना होतात, असे त्यांनी सांगितले.

पश्चिम रेल्वे मजदूर संघाचे विभागीय सचिव अजय सिंह यांनीही रेल्वे आणि कंत्राटदाराच्या निष्काळजीपणावर बोट ठेवले. गेल्या दहा वर्षांत मुंबई विभागात काम करताना रेल्वे हद्दीत ४६ कामगारांचा मृत्यू झाला. यामधे ३८ जण ट्रॅकमॅन आहेत. रेल्वेकडून कोणतीही सुरक्षेची हमी दिली जात नाही हेच आकडेवारीतून दिसून येते. एखाद्या कंत्राटी कामगाराला अपघात झाला तर त्याला मिळणारे उपचार, नुकसानभरपाई यावर तरी रेल्वेने लक्ष ठेवावे आणि काम करताना सुरक्षेची हमी द्यावी ही मागणी असल्याचे सिंह यांनी सांगितले.

  • तीन वर्षांपूर्वी कल्याण पत्री पुलाजवळ झालेल्या रेल्वे अपघातात चार कामगार ठार.
  • फेब्रुवारी २०१६ मध्ये कुर्ला ते विद्याविहारदरम्यान चार कंत्राटी कामगारांचा लोकलच्या धडकेत मृत्यू.
  • जानेवारी २०१७ अंधेरीजवळ धडकेत एक कामगार ठार.

कंत्राटदारांनी रेल्वे कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली पाहिजे. रुळावर काम करताना दोन्ही बाजूला फ्लॅगमॅन ठेवला पाहिजे. काम संपवून सुरक्षितस्थळी जाईपर्यंत या कामगारांची पूर्णपणे काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र, हे नियम कंत्राटदार पाळत नाहीत. या कामगारांना वेळेवर पगार दिला जात नाही आणि त्यांचा विमाही काढला जात नाही.

सफदर सिद्दीकी, सेंट्रल रेल्वे कॉन्ट्रॅक लेबर संघ