नॅशनल रेल्वे मजदूर युनियनकडून तीन गावे दत्तक घेतली;
पाणीपुरवठय़ासह गावात रोजगाराच्या संधीसाठी प्रयत्न
रेल्वे कामगारांच्या हक्कासाठी प्रसंगी प्रवाशांना कटू वाटतील, असे आंदोलनाचे निर्णय घेणारी आणि रेल्वे प्रशासनाला विविध कारणांसाठी कोंडीत पकडणारी मध्य रेल्वेची कामगार संघटना नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने एक नवीन उदाहरण समोर ठेवले आहे. या संघटनेने लातूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त आणि दुर्लक्षित अशी तीन गावे दत्तक घेतली असून या गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यापासून दुष्काळ सरल्यावर गावातील तरुणांना रोजगार मिळवून देणे, शैक्षणिक सुविधा पुरवणे, अशा अनेक गोष्टी राबवण्यात येणार आहेत.
नॅशनल रेल्वे मजदूर युनियन ही मध्य रेल्वेतील सर्वात मोठी रेल्वे कामगार संघटना आहे. कामगारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या या संघटनेने रेल्वे कामगारांचे विविध प्रश्न तडीस नेले आहेत. महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळाची जाण ठेवत रेल्वेने लातूर येथे जलदूत या विशेष मालगाडीद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन रेल्वे कामगारांच्या या संघटनेने लातूरमधील तीन गावे दत्तक घेऊन त्या गावांना दुष्काळात तारण्याचा संकल्प केला आहे.
नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने कवठाखेज, औसा रोड आणि नांदगाव ही लातूर जिल्ह्यातील तीन दुष्काळग्रस्त गावे दत्तक घेतली आहे. या गावांकडे सरकारी, निमसरकारी किंवा खासगी अशा कोणत्याही संस्थांचे लक्ष नाही. त्यामुळे या तीन गावांना दुष्काळात पाणीपुरवठा करण्याचा निर्णय एनआरएमयुने घेतल्याचे एनआरएमयुचे महामंत्री वेणु नायर यांनी सांगितले. या गावांना उन्हाळा संपेपर्यंत दर दिवशी २५ हजार लीटर पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.पाण्याची गरज भागल्यानंतर, समाधानकारक पाऊस पडल्यानंतरही आमच्या संघटनेचे या गावांमधील काम आम्ही चालू ठेवणार आहोत. या गावांमधील सरकारी शाळांमध्ये बसण्यासाठी आसनव्यवस्था नाही, पुस्तकांची वानवा आहे. या सर्व गोष्टी त्या त्या गावच्या सरपंचांशी चर्चा करून आम्ही पुरवणार आहोत. हा सगळा खर्च आमच्या कामगार संघटनेतर्फे म्हणजे सर्व रेल्वे कामगारांकडून केला जाईल. समाजातील एक घटक पाण्यासारख्या गोष्टीसाठी झगडत असताना आम्ही रेल्वे कामगार त्यांच्या मदतीसाठी माणुसकीच्या नात्याने धावून जात आहोत, असे वेणु नायर यांनी स्पष्ट केले.