11 August 2020

News Flash

सार्वजनिक वाहतूक ‘करोना’ग्रस्त!

रेल्वे, बेस्ट, एसटीतील बाधित कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ; मनुष्यबळाअभावी सेवा चालवण्यावर मर्यादा

रेल्वे, बेस्ट, एसटीतील बाधित कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ; मनुष्यबळाअभावी सेवा चालवण्यावर मर्यादा

मुंबई : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या बेस्ट, रेल्वे आणि एसटी उपक्रमांमधील करोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. करोनाच्या भीतीमुळे अनेक कर्मचारी गैरहजर राहात असून त्यांच्यावर निलंबन- बडतर्फीची कारवाई करावी लागत आहे. मात्र त्यामुळे या सार्वजनिक वाहतूक सेवांचे मनुष्यबळ अपुरे पडू लागले असून वाहतूक सेवा चालवण्यावरही मर्यादा येत आहेत.

टाळेबंदीच्या काळापासून जनजीवन बंद असले तरी, बेस्ट आणि एसटीची वाहतूक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरूच होती. टाळेबंदीच्या पहिल्या दिवसापासून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या एसटीचे राज्यात २८९ करोनाबाधित कर्मचारी आहेत. रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयात आतापर्यंत ९९ रेल्वे कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला, तर सध्या येथे १७६ कर्मचारी उपचार घेत आहेत. बेस्टमधील करोनाबाधित कर्मचाऱ्यांची एकूण संख्या १,००४ असून आतापर्यंत ७१० कर्मचारी बरे झाले आहेत, तर मृत कर्मचाऱ्यांची संख्या ८ झाली आहे.

इतक्या मोठय़ा प्रमाणात कर्मचारी करोनाबाधित होऊ लागल्यामुळे अनेक कर्मचारी गैरहजर राहात आहेत. त्यात बाधितांच्या संपर्कात आल्याने अनेक कर्मचारी विलगीकरणात आहेत. यामुळे वाहतूक सेवा देताना अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न या वाहतूक व्यवस्थांना भेडसावत आहे. एसटीच्या अनेक कर्मचाऱ्यांनी संसर्गाच्या भीतीने गावाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे एसटीचे मनुष्यबळ अपुरे पडू लागले आहे. या कर्मचाऱ्यांना कामासाठी प्रोत्साहन देण्याऐवजी ५० टक्के वेतन कपातीचे ‘बक्षीस’ महामंडळाने दिले. करोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या उपचाराची जबाबदारी महामंडळाने अद्याप न घेतल्याने त्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

बडतर्फी, निलंबन..

अत्यावश्यक सेवेत गैरहजर राहिलेल्यांवर बेस्ट उपक्रमाकडून बडतर्फीची कारवाई केली जात आहे. आतापर्यंत ८४ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून हा आकडा आणखी वाढेल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. टाळेबंदीत अनेक कर्मचारी गैरहजर राहिले. अशा कर्मचाऱ्यांना चार्जशीट देऊन कामावर रुजू होण्याचे आदेश दिले गेले. एकूण चार हजार जणांना चार्जशीट देण्यात आली होती. त्यातील काही कर्मचारी हजर झाले. परंतु कर्तव्यावर न येणाऱ्या व अद्यापही टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांना बडतर्फ केले जात आहे. एसटी महामंडळानेही गैरहजर कर्मचाऱ्यांचे निलंबन करून त्यांचे वेतन रोखले आहे. तर काही कर्मचाऱ्यांना उपस्थितीनुसार वेतन दिले जात आहे. त्यामुळे राज्यातील अन्य भागांत कर्तव्यावर हजर नसलेल्यांना संपूर्ण वेतन आणि मुंबई महानगर परिसरात कर्तव्य बजावूनही कमी किंवा शून्य वेतन असा प्रकार आहे.

रुग्ण परिस्थिती

’ एसटी महामंडळाचे १५६ कर्मचारी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. यात सर्वाधिक मुंबई विभागातील मुंबई सेन्ट्रल, कुर्ला नेहरू नगर, परळ आगार, उरण, पनवेल आगारातील एकूण ९९ कर्मचारी आहेत. तर ठाणे विभागातील खोपट, वंदना आगार, शहापूर, कल्याण, भिवंडी आगारांतील ११९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

’ रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयात पश्चिम रेल्वेच्या ४५ आणि मध्य रेल्वेच्या १३० तर मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एका कर्मचाऱ्यावर उपचार सुरू आहे.

’ बेस्टमधील करोनाबाधित कर्मचाऱ्यांची एकूण संख्या १,००४ असून आतापर्यंत ७१० कर्मचारी बरे झाले आहेत, तर मृत कर्मचाऱ्यांची संख्या आठ झाली आहे. परंतु बेस्ट उपक्रमाच्या परिवहन, विद्युत व अन्य विभागांतील एकूण ८१ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा बी.ई.एस.टी. वर्कर्स युनियनने केला आहे. मृतांच्या वारसांना नोकरी द्यावी लागेल आणि काही लाखांची विमा रक्कमही द्यावी लागणार असल्यानेच बेस्ट उपक्रम ही माहिती लपवत असल्याचा आरोप युनियनचे नेते शशांक राव यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 3:48 am

Web Title: railways best and st employees affected by coronavirus zws 70
Next Stories
1 करोनाच्या भीतीपेक्षा रोजगार महत्त्वाचा
2 बालके बाधित होण्याच्या प्रमाणात वाढ
3 लोअर परळ कारखान्याचे ड्रोनद्वारे निर्जंतुकीकरण
Just Now!
X