चार महिन्यांत ३,४२१ जणांचा विनातिकीट प्रवास; रेल्वेकडून ११ लाखांहून अधिक दंडवसुली

मुंबईतील पहिल्यावहिल्या वातानुकूलित लोकललाही फुकटय़ा प्रवाशांची बाधा झाली असून अवघ्या चार महिन्यांत तब्बल साडेतीन हजार फुकटय़ा प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. फुकटय़ा प्रवाशांची संख्या वाढल्याने रेल्वेने विशेष मोहीम राबवत दंडवसुली सुरू केल्याने मार्च-एप्रिलमध्ये फुकटे प्रवासी कमी झाले. आतापर्यंत रेल्वेने फुकटय़ा प्रवाशांकडून ११ लाखांहून अधिक दंडवसुली केली आहे.

२५ डिसेंबर रोजी पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते चर्चगेट अशी पहिली वातानुकूलित लोकल गाडी धावली. प्रथम सहा फेऱ्या व्हायच्या. त्यानंतर त्या वाढवण्यात आल्या. सध्या या गाडीच्या चर्चगेट ते बोरिवली, विरापर्यंत १२ फेऱ्या होत आहेत, परंतु अनेक जण बिनदिक्कतपणे या गाडीतून प्रवास करत आहेत. रेल्वेकडून अशा प्रवाशांना समज देतानाच दंडात्मक कारवाईचा बडगाही उचलला जात होता. सध्या पश्चिम रेल्वेने सामान्य लोकल गाडीच्या प्रथम श्रेणीचे तिकीट आणि वातानुकूलित लोकल गाडीचे तिकीट शुल्कातील फरक आकारून प्रवास करण्याची मुभा दिली आहे. यानंतर तरी वातानुकूलित लोकलमधील फुकटे प्रवासी कमी होतील, अशी अपेक्षा होती. परंतु फुकटय़ांचा प्रवास सुरूच आहे.

फुकटय़ा प्रवाशांविरोधात पश्चिम रेल्वेने कारवाईचा बडगा उचलला आहे. डिसेंबर २०१७ ते १३ एप्रिल २०१७ पर्यंत केलेल्या कारवाईत तीन हजार ४२१ फुकटय़ा प्रवाशांना पकडण्यात आले. डिसेंबर महिन्यात ४७ प्रवाशांना पकडण्यात आले होते. ही संख्या जानेवारी महिन्यात एक हजार ६० वर गेली, तर फेब्रुवारी महिन्यात एक हजार ३०८ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे.

२५० रुपये दंड

एखाद्या प्रवाशाने विनातिकीट प्रवास केल्यास प्रवास भाडे आणि रेल्वेचा कमीत कमी २५० दंड वसूल केले जातात. जर दंडापेक्षा तिकिटाची रक्कम अधिक असेल तर २५० रुपये असलेल्या दंडातही वाढ होते, असे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.

दंडवसुली

महिना                        दंड

डिसेंबर २०१७            १५,७२०

जानेवारी २०१८         ३,४४,९३०

फेब्रुवारी २०१८          ४,२७,७८५

मार्च २०१८                २,५३,५८४

एप्रिल २०१८               ७३,९३०