News Flash

सामान्यांच्या असामान्य कर्तृत्त्वाला रेल्वेचा सलाम

पावसाळ्याच्या दिवसांत अकोल्यातील एका नदीवरील रेल्वे पुलाचा काही भाग कोसळून रेल्वे रुळांवर पडला होता. या ठिकाणी गाडी जोरात जात असल्याने अपघाताची शक्यता होती.

| April 14, 2014 02:27 am

पावसाळ्याच्या दिवसांत अकोल्यातील एका नदीवरील रेल्वे पुलाचा काही भाग कोसळून रेल्वे रुळांवर पडला होता. या ठिकाणी गाडी जोरात जात असल्याने अपघाताची शक्यता होती. मात्र ट्रॅकमन समाधान झंगो यांनी हा प्रकार पाहिला आणि या रुळावरून कोणतीही गाडी जाणार नाही, यासाठी प्रयत्न केले आणि दुर्घटना टाळली़ समाधान झांगो यांच्यासारखेच अनेक कर्मचारी रेल्वेमध्ये आपली सेवा निरपेक्षपणे करत असतात. या सामान्य कर्मचाऱ्यांच्या असामान्य कर्तृत्त्वाला सलाम करण्यासाठी देण्यात येणाऱ्या मध्य रेल्वेच्या ‘महाव्यवस्थापक पुरस्कारां’चे वितरण शुक्रवारी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील रेल्वेच्या सभागृहात पार पडले. या वेळी गेल्या वर्षभरात रेल्वेसाठी निर्णायक कामगिरी बजावलेल्या २३०हून अधिक कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
मध्य रेल्वेच्या नागपूर, भुसावळ, सोलापूर, पुणे आणि मुंबई या पाच विभागांमधील कर्मचाऱ्यांच्या दरवर्षीच्या कामगिरीचा लेखाजोगा घेऊन त्यांच्यापैकी उत्कृष्ट कर्मचाऱ्यांना मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांतर्फे हा पुरस्कार दिला जातो. यंदा ब्रिगेडियर सुनीलकुमार सूद यांच्या हस्ते या सर्व पुरस्कारांचे वितरण झाले. पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्त्वाची माहितीही या वेळी उपस्थितांना देण्यात आली.
तीन-चार महिन्यांपूर्वी सीवूड्स दारावे आणि नेरूळ या स्थानकांदरम्यान निसटलेल्या फिशप्लेट्स पाहून त्याची माहिती नेरूळच्या स्टेशन अधीक्षकांना देणारे मोटरमन शशीकुमार, मालगाडीच्या डब्याला आग लागल्यानंतर प्राणांची बाजी लावून ती विझवणारे पॉइंट्समन राजेंद्रकुमार केरू ताकधुंडे, डिझेल मालगाडीमधून धुर येत असल्याचे पाहून तातडीने त्याबाबतची सूचना स्टेशन अधीक्षकांना देणारे पुणे विभागातील मुख्य गेटकीपर तानाजी खडके, पुणे विभागात एका फाटकातून स्कॉर्पिओ गाडी रुळावर आली असता तात्काळ ब्रेक लावत मोठा अपघात टाळणारे इंजिन चालक विवेक कुमार, अशा अनेकांच्या कर्तृत्त्वाचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही महाव्यवस्थापकांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. शुक्रवारी संध्याकाळीच मुख्य जनसंपर्क अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारणाऱ्या नरेंद्र पाटील यांनाही दोन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 2:27 am

Web Title: railways common workers uncommon work appreciated
Next Stories
1 बॉयलर स्फोटातील दोन जखमींचा मृत्यू
2 सांताक्रुझ-विक्रोळी जोडरस्ता लवकरच सुरू
3 कोल्हापुरे, झाकीर हुसेन यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
Just Now!
X