अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित असलेली रेल्वे प्रवास सुविधा लवकरच सर्वसामान्यांनाही मिळण्याचे संकेत आहेत. याबाबत रेल्वे आणि राज्य सरकार यांच्यात बुधवारी बैठक होणार आहे. दरम्यान, सर्व महिलांना आजपासून रेल्वेप्रवासास परवानगी देण्यात आली आहे.

आतापर्यंत राज्य सरकार, केंद्रीय कर्मचाऱ्यांबरोबरच पालिका कर्मचारी, सरकारी आणि खासगी रुग्णालय कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची मुभा आहे. त्यापाठोपाठ खासगी क्षेत्रातील नोकरदारांसह सर्वानाच रेल्वेप्रवासाची परवानगी देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. याबाबत अप्पर मुख्य सचिव (गृह विभाग), मध्य आणि पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक, मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस, मुंबई महापालिका, महसूल विभाग आदींच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी बोलावण्यात आली आहे. सर्वाना रेल्वे प्रवासाची परवानगी, त्याचे नियोजन, रुपरेशा आणि अन्य विषयांबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याचे राज्य आपत्ती निवारण प्राधिकरणाचे संचालक अभय यावलकर यांनी सांगितले.

दुसरीकडे, सर्वच महिलांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यावरून गेल्या चार दिवसांपासून निर्माण झालेला तिढा मंगळवारी सुटला. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी २१ ऑक्टोबरपासून सर्वच महिलांना रेल्वे प्रवासाची परवानगी देत असल्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला. त्यामुळे आजपासून सर्व महिलांना रेल्वेप्रवास करता येईल.

महिला विशेष रेल्वेफेऱ्यांमध्ये वाढ

सर्वच महिलांना रेल्वेप्रवासाची परवानगी दिल्यानंतर पश्चिम रेल्वेने महिला विशेष रेल्वे फे ऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला. याआधी दोन महिला विशेष रेल्वे फे ऱ्या सुरू होत्या. बुधवारपासून आणखी चार महिला विशेष रेल्वे फे ऱ्यांची भर पडेल. विरार येथून सकाळी ८.५५ वाजता, त्यानंतर सकाळी ९.४९ वाजता रेल्वे चर्चगेटसाठी सुटेल. चर्चगेट येथून सायंकाळी ६.५५ वाजता आणि रात्री ७.४० वाजता विरारसाठी रेल्वे सुटणार आहे. या फे ऱ्यांमुळे पश्चिम रेल्वेवरील फे ऱ्यांची एकू ण संख्या ७०० वरुन ७०४ होईल. मध्य रेल्वेवर सध्या सीएसएमटी ते कल्याण आणि पनवेल मार्गावर चार महिला विशेष रेल्वेगाडय़ा धावतात.

वेळमर्यादा अशी..

सकाळी ११ ते दुपारी ३ आणि सायंकाळी ७ नंतर शेवटची उपनगरी रेल्वे सुटेपर्यंत सर्वच महिलांना रेल्वे प्रवासाची मुभा असेल. या दरम्यान प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचे फक्त तिकीट ग्राह्य़ धरले जाईल. त्यांना क्यूआर कोड ई-पासची गरज नसेल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

सर्वच महिलांना रेल्वे प्रवासाची परवानगी दिल्यानंतर गाडय़ांना होणारी गर्दी, प्रवासी संख्येचा आढावा घेण्यात येईल. त्यानुसार रेल्वे फेऱ्यांत वाढ करण्यात येईल.

-शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे