रेल्वे अर्थसंकल्पात मुंबई-महाराष्ट्राच्या तोंडाला कायम पाने पुसणाऱ्या रेल्वे मंत्रालयाने अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना देण्यात येणाऱ्या मदतनिधीतही हाच कोडगेपणा कायम ठेवला आहे. दिवा-सावंतवाडी पॅसेंजर अपघातात मृत झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना रेल्वेतर्फे फक्त दोन लाख रुपयेच नुकसानभरपाई देण्यात आली. देशात इतरत्र कोठेही रेल्वे अपघातात कोणी दगावले तर हेच मंत्रालय पाच लाखांची नुकसानभरपाई देते. रेल्वेच्या या लाखमोलाच्या दुजाभावाप्रकरणी संताप व्यक्त होत आहे.
कोकण रेल्वेमार्गावरील अपघातानंतर रेल्वेमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली. याच रेल्वेमंत्र्यांनी त्यांच्या राज्यातील नांदेड-बेंगळुरू गाडीला गेल्या वर्षी डिसेंबरात आंध्र प्रदेशात आग लागली होती त्यावेळी मरण पावलेल्या २० हून अधिक प्रवाशांच्या नातेवाईकांना पाच लाखांची नुकसानभरपाई जाहीर केली होती. वास्तविक रेल्वेच्या नियमांप्रमाणे तातडीची मदत म्हणून मृताच्या नातेवाईकांना ५० हजारापर्यंत, गंभीर जखमींना २५ हजारापर्यंत आणि किरकोळ जखमींना पाच हजार रुपयांपर्यंत मदत देता येते. या मदतीमध्ये वाढ करण्याचा अधिकार रेल्वेमंत्र्यांना असतो. रेल्वेमंत्र्यांनी इतर अपघातांत बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांपर्यंत मदत देऊ केली. मात्र, कोकण रेल्वेवरील अपघाताबाबत त्यांनी हात आखडता घेतला. कुटुंबातील लाखमोलाची व्यक्ती दगावण्यापेक्षा ही मदत नक्कीच मोठी नाही. मात्र केंद्रीय पातळीवरील मंत्र्याने याबाबत दुजाभाव करू नये, अशी इच्छा दिवा-सावंतवाडी पॅसेंजर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.

या अपघातांतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत  
एप्रिल, २०१३
मुजफ्फरपूर-यशवंतपूर गाडी रुळावरून घसरून एक ठार

ऑगस्ट, २०१३
बिहारमध्ये धरमारा स्थानकाजवळ ३७ भाविकांचा चिरडून मृत्यू

जानेवारी, २०१४
डहाणू रोडला डेहराडून एक्स्प्रेसच्या आगीत नऊ ठार