रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासन ५४० कोटी रुपये दरवर्षी खर्च करणार असून अर्थसंकल्पात त्याबाबत तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फ सोमवारी न्यायालयात देण्यात आली. याशिवाय ३०० आरपीएफची पदेही भरणार असल्याची माहितीही न्यायालयाला देण्यात आली.
लांब पल्ल्याच्या गाडीतून प्रवास करताना चोराशी सामना करताना किरण मेहता या तरुणीला पाय गमावावा लागला होता. चोराने तिला आपल्यासोबत खेचल्याने तिच्यावर ही परिस्थिती बेतली होती. मात्र तिच्या उपचाराचा खर्च उचलण्यास रेल्वे प्रशासनाने नकार दिला होता. त्यामुळे किरणने अ‍ॅड्. उय वारूंजीकर यांच्यामार्फत याचिका करून उपचाराचा खर्च देण्याबाबत रेल्वेला आदेश देण्याची मागणी केली होती. या घटनेची न्यायालयाने गंभीर दखल घेत सर्वच प्रकारच्या लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्यांतील प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच रे्ल्वेला त्याबाबत उपाययोजना करण्यास सांगितले होते.
सोमवारी याप्रकरणी झालेल्या सुनावणीच्या वेळी रेल्वे प्रशासनाने प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात त्यांनी रेल्वे सुरक्षेवर ५४० कोटी रुपये खर्च करण्याचे तसेच त्याबाबत अर्थसंकल्पात तरतूद करण्याचे म्हटले आहे. शिवाय तीन हजार आरपीएफची रिक्त पदे भरण्याचे म्हटले आहे.
न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यात ठेवली आहे.