उन्हाळी सुटय़ांपेक्षा ख्रिसमसच्या सुटीत जास्त खप; वर्षभरात उपनगरीय रेल्वेवर तीन लाखांहून अधिक तिकिटांची विक्री
देशविदेशातून किंवा परराज्यातून मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना या मायानगरीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत विनासायास पोहोचवण्याचे काम मुंबईची उपनगरीय लोकल करते. या पर्यटकांसाठी रेल्वेचे विशेष पर्यटन तिकीट असून एक, तीन आणि पाच दिवसांसाठी mv02मिळणाऱ्या या तिकिटांना पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे या पर्यटन तिकिटांची विक्री उन्हाळी सुटय़ांपेक्षाही हिवाळ्यात म्हणजेच ख्रिसमसच्या सुटीदरम्यान सर्वात जास्त होत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
रेल्वेने मुंबईत येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी पर्यटन तिकीट ही संकल्पना राबवली आहे. या संकल्पनेनुसार पर्यटकांना पश्चिम किंवा मध्य अशा कोणत्याही रेल्वेमार्गावरून एक, तीन किंवा पाच दिवसांसाठीचे तिकीट काढता येते. या तिकिटावरून विहित कालावधीत पर्यटकांना मुंबई उपनगरीय क्षेत्रात हवे तिकडे हव्या तेवढय़ा वेळा प्रवास करण्याची मुभा असते. प्रथम तसेच द्वितीय श्रेणीच्या या तिकिटांची किंमत कमीत कमी ७५ रुपये ते जास्तीत जास्त ५१५ रुपये एवढी आहे. हे तिकीट लहान मुलांसाठीही घेता येत असून त्यासाठीचे कमीत कमी शुल्क ५५ रुपये आणि जास्तीत जास्त शुल्क २९० रुपये एवढे आहे.
वर्षभरात मध्य तसेच पश्चिम रेल्वेवर एकूण ३ लाख १४ हजार ९९ एवढी पर्यटन तिकिटे विकली गेली. यात मध्य रेल्वेवरील तिकिटांची संख्या १ लाख ४९ हजार ४९४ एवढी असून पश्चिम रेल्वेवर १ लाख ६४ हजार ६०५ तिकिटांची विक्री झाली. या तिकीट विक्रीतून दोन्ही रेल्वेंवर मिळून ६ कोटी ७१ लाख ९१ हजार ८३२ रुपये उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे वर्षभरातील तिकीट विक्रीवर नजर टाकल्यास मध्य तसेच पश्चिम रेल्वेवर उन्हाळी सुटय़ांपेक्षा हिवाळ्यात म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात जास्त पर्यटन तिकिटांची विक्री झाल्याचे आढळते.
गेल्या वर्षी एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ५१,७७२ एवढी तिकिटे विकली गेली. तर नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांत या दोन्ही मार्गावर विकल्या गेलेल्या तिकिटांची संख्या ५४,१६० एवढी आहे. विशेष म्हणजे या चार महिन्यांव्यतिरिक्त मध्य रेल्वेवर सप्टेंबर महिन्यातही १६ हजारांच्या वर तिकीट विक्री झाली होती. सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव असल्याने मध्य रेल्वेवरील स्थानकांजवळील मोठमोठय़ा गणपतींचे दर्शन घेण्यासाठी पर्यटक मुंबईत येतात. त्यामुळे ही वाढ सप्टेंबर महिन्यात झाल्याचे रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.