वर्षभर धूळ, धूर आणि हानिकारक वायूंनी भरलेली मुंबईची हवा पावसामुळे स्वच्छ झाली आहे. सायन आणि वांद्रे येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उभारलेल्या प्रदूषण मापन यंत्रांमध्ये कधी नव्हे ते सल्फर, नायट्रोजन आणि धुलीकण यांचे प्रमाण धोकादायक पातळीपेक्षा खाली उतरल्याची नोंद झाली आहे.
शेती आणि पाणीपुरवठा या दोन्हीसाठी महत्त्वाचा असलेला पाऊस हा हवा स्वच्छ करण्याचेही काम करतो. वर्षभर धूळ, वायू यामुळे प्रदूषित झालेली हवा पावसाळ्यात स्वच्छ होते. पाऊस सुरू झाला की, काही दिवसांनी सर्वसामान्य नागरिकांनाही याचा अनुभव येतोच. प्रदूषणमापन यंत्रावरील नोंदीही याला पुष्टी देत आहेत. हवेतील प्रदूषण वाढवणाऱ्या घटकांमध्ये सल्फर, नायट्रोजन यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे शहरभर सुरू असलेली इमारतीची बांधकामे, मेट्रो, मोनो, रस्त्यांचे काम यांच्यामुळे धूळ वाढते. २४ तास सुरू असलेल्या वाहतुकीमुळेही हवेतील प्रदूषणात वाढ होते.
हवेतील प्रदूषणाची पातळी नोंदवण्यासाठी वांद्रे तसेच सायन येथे दोन केंद्र आहेत. सल्फरडाय ऑक्साइड, नायट्रोजन आणि त्याची ऑक्सिजनसोबतची संयुगे तसेच धुलीकण यांची नोंद या केंद्रात सतत होत राहते. एका घनमीटर हवेत सल्फरडाय ऑक्साइड तसेच नायट्रेट्सचे प्रमाण ८० मायक्रोग्रॅमपेक्षा कमी तर धुलीकणांचे प्रमाण १०० मायक्रोग्रॅमपेक्षा कमी पातळीवर असावे, असा निकष आहे. वर्षांतील बहुतांश वेळा हे प्रमाण धोकादायक पातळीच्या वर असते. एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ाशी तुलना केली असता नायट्रोजन तसेच धूलीकणांच्या प्रमाणात आता पडलेला फरक लक्षात येतो. पावसाळा संपल्यावर प्रदुषक घटकांचे हे प्रमाण वाढत जाते. ‘पावसामुळे हवेतील प्रदुषणकारी घटक, पाण्यात विरघळतात, त्यामुळे हवेतील प्रदुषणाची पातळी कमी होते,’ असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव विद्यानंद मोटघरे यांनी सांगितले.