तीन दिवसातील विक्रमी पावसामुळे मुंबई निथळत असली तरी मध्य महाराष्ट्र व मराठवाडा मात्र पावसासाठी आसुसलेले आहेत. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्टय़ामुळे कोकणात मुसळधार पाऊस सुरू असला तरी विदर्भवगळता उर्वरित १८ पैकी बहुतांश जिल्ह्य़ात पावसाची शून्य मिमी नोंद झाली.  अतिपावसाच्या क्षेत्रात येत असलेल्या मुंबईत पावसाने ठाण मांडले आहे. कोकणातील इतर जिल्ह्य़ांच्या तुलनेतही मुंबईत गेल्या तीन दिवसात दुपटीपेक्षा अधिक पाऊस पडला. राजधानीत विक्रमी पाऊस पडत असला तरी विदर्भवगळता राज्याच्या इतर भागात ठणठणाट आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा व बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाचे ढग होते. त्यामुळे सर्वच राज्यात पाऊस पडण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला होता.
बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांनी विदर्भात मध्यम स्वरूपाच्या सरी आणल्या तर अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्टय़ाने कोकणात मुसळधार वृष्टी केली.
आता अरबी समुद्रात गुजरात ते केरळ कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने पुढील किमान पाच दिवस कोकणपट्टीत मुसळधार वृष्टीचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे.

तलावात पाऊस नाहीच..
रविवार सकाळपर्यंतही मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा व भातसा क्षेत्रात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. मोडकसागरमध्ये १८ मिमी, मध्य वैतरणात १७ मिमी, अप्पर वैतरणात ८ मिमी पाऊस पडला. तानसा येथे १७ मिमी तर भातसा येथे १५ मिमी पावसाची नोंद झाली. २०१३ च्या तुलनेत तलावक्षेत्रात ४० टक्केही पाऊस झालेला नाही.

दक्षिण रायगडला मुसळधार पावसाने झोडपले आहे. त्यामुळे गांधारी नदीने रविवारी संध्याकाळी धोक्याची पातळी ओलांडली. नाते पुलावरून पाणी गेल्याने नाते गावचा संपर्क तुटला. दरम्यान पावसाचा जोर कायम राहिल्यास महाड शहरालाही पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.