News Flash

‘जल’वाहतूक!

भरतीच्या वेळेतच जोरदार बरसणाऱ्या जलधारांनी मुंबईची वाहतूक व्यवस्था कोलमडून टाकली.

मुंबई : भरतीच्या वेळेतच जोरदार बरसणाऱ्या जलधारांनी मुंबईची वाहतूक व्यवस्था कोलमडून टाकली. सतत कोसळणारा पाऊस आणि भरतीच्या जोरामुळे पंपाद्वारे पाणी उपसण्याचे फोल ठरलेले प्रयत्न यामुळे शहर आणि उपनगरांतील अनेक भागांत पाणी साचले. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. करोना निर्बंध हटवण्यात आल्यामुळे दोन दिवसांपूर्वीच सुरळीत झालेल्या व्यवहारांना बुधवारी खीळ बसली. रेल्वे बंद असल्यामुळे खासगी वाहनांतून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांचा तर अख्खा दिवस पाण्यातूनच गेला.

चुनाभट्टीच्या सुमननगर चौकात बुधवारी सकाळीच पावसाचे पाणी साचू लागले. पावसाचा जोर आणि भरतीची वेळ एकच ठरल्याने येथे पाणी दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी जमले. पाणी साचण्याचा वेग लक्षात घेऊन महापालिका कामगारांनी पंपांद्वारे पाणी जवळच्या नाल्यात उपसण्याचा प्रयत्न केला. मात्र पावसाचा जोर इतका होता की रस्त्यावरचे पाणी काही केल्या कमी होत नव्हते. शिवाय मोठी भरती असल्याने नाल्यातील पाणीही नेहमीच्या वेगाने खाडी, समुद्राच्या दिशेने जात नव्हते. दुपारी चापर्यंत चौकाच्या चारही दिशांना वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. शीव-पनवेल आणि मुंबई-ठाणे मार्गावरील वाहतूक या चौकातून होते. त्यामुळे ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने शहरात येणारी आणि बाहेर पडणारी वाहतूक या चौकात पाणी शिरल्यामुळे खोळंबली होती.

नेहमीप्रमाणे शहरातील सर्व सखल भाग उदाहरणार्थ दादर, हिंदमाता, शीव रुग्णालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, किंग्ज सर्कल, कुर्ला-कमानीजवळील लालबहाद्दूर शास्त्री मार्ग, एस. व्ही. मार्गावरील बेहरामबाग चौक, नेताजी पालकर चौक, नीलम चौक, गोवंडी आदी भागांत पाणी साचले. त्यामुळे या भागातील वाहतूक काही कालावधीसाठी पूर्णपणे ठप्प होती. विशेषत: लहान गाडय़ा, दुचाकींना गुडघाभर पाण्यातून  पुढे सरकणे शक्य नसल्याने ही वाहने जिथल्या तिथे खोळंबून पडली.

पश्चिम द्रुतगती मार्गावर ठिकठिकाणी पाणी साचले. या मार्गावरील प्रत्येक उड्डाणपुलाखालील चौक, रस्त्यांवर पाणी साचले होते. तरीही या मार्गावरील वाहनांची रहदारी सुरू होती. मात्र या मार्गावरील पूर्व-पश्चिम भाग जोडणाऱ्या सर्वच भुयारी मार्गावर पाणी साचल्याने ते वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. परिणामी पूर्व-पश्चिम वाहतूक करणाऱ्या नागरिकांना बराच मनस्ताप सोसावा लागला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पूर्व-पश्चिम जोडणारे मोजके  उड्डाणपूल असल्याने त्यावर ताण पडला. तेथे वाहतूक खोळंबा झाला.

पाणी साचलेल्या प्रत्येक रस्त्यावर वाहने बंद पडत होती. त्यात बस, मालवाहू ट्रक या अवजड वाहनांचाही समावेश होता. भरपावसात, साचलेल्या पाण्यात बंद पडलेली वाहने कडेला घेऊन रस्ता मोकळा करण्याचे आव्हान वाहतूक पोलिसांवर होते. अनेक ठिकाणी पोलिसांनी स्थानिक नागरिकांना, अन्य वाहनचालकांना सोबत घेऊन ही वाहने रस्त्याकडेला घेतली. तर काही ठिकाणी पोलिसांना कर्षण यंत्र (क्रेन) बोलावावे लागले.

खासगी वाहनांची गर्दी

लोकल प्रवासाची परवानगी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच असल्यामुळे निर्बंध शिथिल झाल्यास खासगी वाहनांची रस्त्यावरील वर्दळ वाढली आहे. पावसाची सूचना असली तरी अनेक कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली नव्हती. त्यामुळे सकाळी खासगी वाहने घेऊन कार्यालयात निघालेले कर्मचारी वाहतूककोंडी आणि रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात अनेक ठिकाणी अडकले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 2:51 am

Web Title: rain heavy rainfall traffic jam mu mumbai road under water ssh 93
Next Stories
1 रुग्णसेवेवर पावसाचा विशेष परिणाम नाही
2 आठवडय़ाभराचा लससाठा उपलब्ध केल्यास नोंदणीतील समस्या दूर
3 रेल्वे मार्गातील मोऱ्यांवर ३० कोटी खर्च
Just Now!
X