पावसाळय़ात मुंबईतील रस्त्यावर पडणारे खड्डे नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. मात्र, या वर्षी तर वाहनधारक आणि पादचाऱ्यांना रस्त्यांवरून चालताना पावलोपावली खड्डय़ांचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे दहिसर ते वांद्रे या अवघ्या २२ किलोमीटरच्या प्रवासाला ३०-४० मिनिटांऐवजी तब्बल दोन ते अडीच तास लागत आहेत.
पालिकेचे रस्ते असोत की मोनो-मेट्रोसारखे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या प्रकल्पांलगतचा परिसर असो, ‘खड्डेच खड्डे चोहीकडे’ असे दृश्य मुंबईत सर्वत्र दिसत आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गाचे रूपांतर ठिकठिकाणच्या खड्डय़ांमुळे ‘संथगती मार्गा’त झाले आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर दहिसर चेकनाका ओलांडून मुंबईच्या दिशेने निघाले की खड्डेमय रस्त्यावर वाहनचालकांची कसरत सुरू होते. मालाड-दिंडोशी येथील ओबेरॉय मॉलनजीकचा पट्टा, बिंबिसार नगरजवळच्या पट्टय़ात रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. अशा खड्डेमय रस्त्यामुळे वाहतुकीचा वेग प्रचंड मंदावला असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन २०-२५ मिनिटे गाडी इंचभरही हलत नाही अशी परिस्थिती आहे. यामुळे एरवी अध्र्या-पाऊण तासात होणाऱ्या प्रवासाला दोन ते अडीच तास लागत आहेत.
‘आडोशां’ना मार्शलचा अडसर!
पावसाळी वातावरण आणि तासन्तास वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे वाहनचालकांना सध्या वेगळय़ाच अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तासन्तास वाहतूक कोंडीत फसल्यानंतर वाहनचालकांना लघुशंका येते. मात्र, द्रुतगती महामार्गावर स्वच्छतागृहांची कमतरता असल्याने बरेच वाहनचालक आडोसा मिळेल तेथे खाली उतरून ‘मोकळे’ होतात. पण त्याठिकाणीच नेमके तैनात करण्यात आलेले महानगरपालिकेचे मार्शल ‘दंड’ ठोठावण्यास प्रकट होतात आणि ५०-१०० रुपयांचा दंड उकळतात. पुरुषांना ‘आडोसे’ गाठायची सोय असली तरी महिलांना तर तेही शक्य नाही.  

खड्डेमुक्त रस्त्यां’साठी..
मुसळधार पावसामुळे राज्यभर रस्त्यांची पुरती दैना उडाली आहे. खड्डय़ांतून प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे कंबर आणि पाठदुखीचा त्रास बळावतो आहे. या पाश्र्वभूमीवर रस्ते ‘खड्डेमुक्त’ करण्याचा प्रयत्न ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आपल्या परिसरातील खड्डय़ांची छायाचित्रे ‘लोकसत्ता’कडे loksattavruttant@gmail.com  या ई-मेलवर पाठवावीत. ही छायाचित्रे प्रसिद्ध केली जातील व त्याचा पाठपुरावाही केला जाईल.