दणक्यात पुनरागम करणाऱ्या पावसाचा जोर गुरुवारी ओसरला. दोन दिवसानंतर पावसाचा जोर वाढेल, असा वेधशाळेचा अंदाज आहे.
बुधवारी दिवसभर उपनगरात बरसलेला पाऊस रात्री दक्षिण मुंबईत सरकला. बुधवारी सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठमध्ये कुलाबा येथे १७ मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर मात्र पावसाचा जोर वाढला. सकाळी साडेआठपर्यंत १३८ मिमी पाऊस पडला. सांताक्रूझमध्ये रात्री पावसाचा जोर कमी झाला. सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासात पावसाने २०७ मिमीची नोंद केली. त्याआधी रात्री साडेआठपर्यंतच १८१ मिमी पाऊस पडला होता. राज्याच्या इतर भागात मात्र पावसाची प्रतिक्षा कायम आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता क्षीण झाला असल्याने मुंबईतील पावसाचा जोरही ओसरला आहे. पुढील दोन दिवस पावसाचे प्रमाण कमी राहील. मात्र त्यानंतर नैर्ऋत्येकडून अरबी समुद्रातून मान्सूनचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई हवामानशास्त्र विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
तलावक्षेत्र मात्र जलधारांच्या प्रतीक्षेत
मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये मात्र फारसा पाऊस बरसला नाही. मुंबईतील विहार तलावक्षेत्रात १७६ मिमी तर तुळशी तलावक्षेत्रात १९१ मिमी पावसाची नोंद झाली. विहारमध्ये ३२६ दशलक्ष लिटर पाणी, तुळशी तलावात ३०५ दशलक्ष लिटर पाणीसाठा वाढला.  मुख्य तलावांपैकी भातसा तलावात अवघ्या २० मिमीची नोंद झाली. सर्व तलावक्षेत्रांत गुरुवारी १,०९,२४१ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होते.