रविवारी दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईत चार ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. यामुळे स्थानिकांची दैना उडाली. पावसामुळे शहर आणि उपनगरात एकूण २१ ठिकाणी झाडे पडल्याची, तर पाच ठिकाणी घरे कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

मुंबई शहर आणि उपनगरात पावसाचा जोर होता. दिवसभरात कुलाबा हवामान केंद्रात ५० मिमी आणि सांताक्रुझमध्ये २३ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे तर चार ठिकाणी पाणी तुंबले. पूर्व उपनगरात कुर्ला नेहरू नगर, चुनाभट्टी डेपो आणि पश्चिम उपनगरात अंधेरी पश्चिमेकडील वीरा देसाई रोड, सांताक्रुझ पूर्वमधील शास्त्रीनगर भागात पाणी तुंबले होते.शहरात सहा ठिकाणी, पूर्व उपनगरात पाच ठिकाणी आणि पश्चिम उपनगरात दहा ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. शहरात तीन ठिकाणी आणि पूर्व उपनगरात दोन ठिकाणी घर कोसळण्याच्या  घटनेत प्रत्येकी एक जण जखमी झाले.

मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

मोसमी वारे उत्तरेकडील प्रवास करण्याइतपत प्रबळ नसले तरी गेले दोन दिवस कोकण किनारपट्टीवर पावसाच्या सरी येत आहेत. दक्षिण कोकणात पावसाचा जोर अधिक आहे. बुधवार व गुरुवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रातही पावसाची हजेरी लागणार असून काही ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता आहे.  मुंबईत ९ जून व विदर्भात १२ जूनला प्रवेश केलेल्या मोसमी वाऱ्यांचा प्रवास त्यानंतर थबकला आहे.नाशिक, धुळे तसेच औरंगाबाद यासारख्या जिल्ह्य़ांमध्ये पाऊस पोहोचलेला नाही. पुढील आठवडाभर मोसमी वारे पुढे सरकणार नाहीत . साधारण २४-२५ जूनपासून मोसमी वारे पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज आहे. रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत वसई येथे सर्वाधिक ७९ मिमी पाऊस पडला. भिवंडी येथे ७० मिमी, देवगड येथे ७० मिमी तर मालवण येथे ६२ मिमी पाऊस झाला.