गेल्या आठ वर्षांमध्ये पालिकेने ब्रिमस्टोवॉड प्रकल्पापासून नालेसफाईपर्यंत विविध कामांवर हजारो कोटी रुपये खर्च केल्यानंतरही मुंबईत ४०० मि.मी. पाऊस पडल्यानंतर सखल भाग जलमय झाल्याने या कामांबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
२६ जुलै २००५ रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत हाहाकार उडाला होता. त्यानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आणि पालिकेने ब्रिमस्टोव्ॉड प्रकल्प हाती घेतला. सखल भागात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी नऊ ठिकाणी उदंचन केंद्रे उभारणे, नाले-नद्यांच्या पात्रांचे रुंदीकरण आणि खोलीकरण, पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे उभारणे अशी विविध कामे हाती घेण्यात आली. त्याशिवाय दरवर्षी नाले आणि नद्यांच्या सफाईची कामेही जोमाने होऊ लागली, मात्र काही ठिकाणी नाल्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात पालिका अपयशी ठरल्याने त्या भागात रुंदीकरणाचे काम रखडले. नाल्यालगतच्या वस्त्यांमधून टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याला पायबंद घालणेही पालिकेला शक्य झाले नाही, अशी कबुली पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली. दरवर्षी पावसाळा जवळ येताच पालिकेकडून नालेसफाईची कामे हाती घेण्यात येतात. मात्र सफाईनंतर झोपडपट्टय़ांमधून टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याने नाले तुडुंब भरतात. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईतील सखल भाग जलमय होतात आणि पालिकेवर ठपका ठेवला जातो.