पुढच्या काही तासात मुंबईसह कोकण, गोवा पट्टयात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. सोसाटयाच्या वाऱ्यासह वादळी स्थिती निर्माण होईल असे स्कायमेटने म्हटले आहे. स्कायमेट हे हवामान विषयक माहिती देणारे संकेतस्थळ आहे. दक्षिण कोकण आणि गोव्यामध्ये तयार होणाऱ्या वादळी स्थितीमुळे पावसाचा जोर वाढणार असल्याचे म्हटले आहे.

मागच्या काही दिवसांपासून केरळमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे तिथे काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पण आता केरळ आणि दक्षिण कर्नाटकमध्ये पावसाचे प्रमाण कमी होईल. ४८ तासानंतर पाऊस अधिक गती पकडेल आणि संपूर्ण पश्चिम किनारपट्टी उत्तर कोकण ते केरळमध्ये मुसळधार पाऊस कोसळले असा स्कायमेटचा अंदाज आहे. कोकणात जोरदार पाऊस कोसळत आहे पण मुंबईत अजूनही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही.

दक्षिण कोकण आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस कोसळेल. मागच्या २४ तासात गोवा पणजी येथे १५५ मिमि, रत्नागिरी १४५ मिमि, मंगळुरु ११५ मिमि, कारीपूर ७८ मिमि, कोची ७३ मिमि, कन्नूर ४९ मिमि पावसाची नोंद झाली आहे.