रस्त्यांवर बंद पडलेली वाहने, उन्मळून पडलेल्या वृक्षांचा अडथळा

मुंबई : तुंबलेले पाणी ओसरल्यावरही शहरातले अनेक मार्ग गुरुवारी वाहतुकीसाठी पूर्णपणे खुले होऊ शकले नाहीत. बंद पडलेल्या वाहनांसह उन्मळून पडलेले वृक्ष आणि कोसळलेल्या दरडींचा ढिगारा बाजूला करण्याची कवायत गुरुवारी सुरू होती.

बुधवारी शहराच्या कानाकोपऱ्यात पाणी साचले होते. त्यातील काही भागांमधील पाण्याचा निचरा गुरुवारी पहाटेपर्यंत झाला. मात्र काही भाग मोकळे होण्यास दुपार उलटली. पश्चिम उपनगरांतील बहुतांश सब-वेमध्ये साचलेले पाणी दुपापर्यंत होते. दुपारनंतर पाण्याचा निचरा झाल्याने हे सब-वे वाहतुकीसाठी खुले करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी कांदिवली येथे दरड कोसळल्याने शहराकडे येणारी मार्गिका वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती. रस्त्यावर आलेला मातीचा ढिगारा पूर्णपणे उपसण्यात आला. मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या मार्गिकेवरून वाहतूक सुरू करण्यास परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे दहिसर, बोरिवलीहून वांद्रे, दादरकडे येणारी वाहतूक अन्य मार्गिकेवरून(दहिसरच्या दिशेने जाणाऱ्या) आणि एस. व्ही. मार्गावरून वळविण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. त्यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर दहिसर, बोरिवली येथे वाहतूक कोंडी होती.

पूर्व मुक्त मार्ग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीसाठी बंद होते. गुरुवारी पूर्वमुक्त मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली. मात्र पी. डीमेलो मार्गावर वृक्ष उन्मळून पडले. फांद्या छाटून, कापून रस्ता मोकळा करण्यात दोन ते तीन तास गेले. तोवर या मार्गावरील वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करावी लागली. दुपारी मंत्रालयाजवळही असाच प्रसंग घडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर शीव, माटुंगा, दादर, भायखळा भागांत बुधवारी पाणी साचले होते. त्यामुळे बेस्टसह अन्य बस, मालवाहू ट्रक, कार, टॅक्सी अशी अनेक वाहने रस्त्यामध्येच बंद पडली होती. मात्र बस, ट्रक आदी वाहने रस्त्याकडेला आणण्यासाठी कर्षण वाहनांची (क्रेन) निकड भासली. गुरुवारी दुपापर्यंत वाहने बाजूला करण्याची कवायत सुरू होती.

कांदिवली दरड अद्याप कायम, एक मार्गिका खुली

मुंबई : कांदिवली येथे पश्चिम द्रुतगती मार्गावर मंगळवारी कोसळलेली दरड अद्याप पूर्णपणे हटविण्यात यश आलेले नाही. दरम्यान बुधवारी डोंगरातील आणखी एक मोठा दगड कोसळल्याने हा टप्पा वाहतूकीसाठी पूर्ण बंद करण्यात आला. एमएमआरडीए सध्या ही दरड हटविण्यासाठी प्रयत्नशील असून, डोंगराचा आणखी भागास धक्का न लागता काम पूर्ण होईल यावर काम सुरु आहे. गुरुवारी द्रुतगती मार्गावरील एक मार्गिका वाहतूकीसाठी खुली करण्यात आली. सतत मोठी वाहतूक असणाऱ्या या मार्गावर एरवीच वाहतूक कोंडीचा सातत्याने सामना करावा लागतो. त्यात सध्या एकच मार्गिका खुली असल्याने येथील अडचणीत भरच पडली आहे.