बुधवारी पहिल्या पावसातच अनेक भागात मुंबईची तुंबई झाल्याचं चित्र दिसून आलं. अनेक भागांत ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे मुंबईकरांचे हाल झाले. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मुंबईची तुंबई होण्याला जबाबदार कोण? यावर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून भाजपा आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी मुंबई महानगर पालिकेवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. “पहिल्या पावसातच कटकमिशनचे सगळे व्यवहार उघडे! मुंबईकर हो! सत्ताधीशांचा हा वसुलीचा नाद खुळा, नेमेचि येतो पावसाळा, पाच वर्षांत १ हजार कोटींचा घोटाळा!” असं ट्वीट करत आशिष शेलार यांनी मुंबई महानगर पालिकेच्या कारभारावर निशाणा साधला आहे.

५ वर्षांत १ हजार कोटींचा घोटाळा!

दरम्यान, या ट्वीटसोबत पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये आशिष शेलार यांनी मुंबईत ५ वर्षांत १ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. “पहिल्या पावसामध्ये पुन्हा मुंबई तुंबली. दुर्दैवाने मुंबईकरांचा जीव टांगणीला लागला. १०४ टक्के किंवा १०७ टक्के नालेसफाईचा दावा फोल ठरला. प्रशासनाने काम केलं नाही. कंत्राटदाराने पळ काढला. सत्ताधाऱ्यांनी कंत्राटदारांच्या कृत्यांवर पांघरूण घातलं. मुंबईत दरवर्षाला ७० ते १०० कोटी रुपये खर्च होतात. ५ वर्षांत ५०० कोटी रुपये. ते सोडून छोटे नाले, स्टॉर्म वॉटर ड्रेन, दुरुस्ती वा अन्य कामांसाठीचे दरवर्षाला १०० कोटींप्रमाणे असे ५ वर्षाला ५०० कोटी. म्हणजे ५ वर्षांत १ हजार कोटींचा खर्च करूनही मुंबईकरांच्या नशिबी तुंबलेलं पाणी घरात घुसण्याची वेळ आली”, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

 

मुंबईत पाणी भरणार नाही असा दावा कधीच केला नव्हता – किशोरी पेडणेकर

दरम्यान, मुंबईतल्या ज्या भागांत आधी पाणी साचत नव्हतं, तिथेही आता पाणी साचलं आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. “स्टॉर्म वॉटर ड्रेनमध्ये मलब्याच्या गोण्या पडल्या आहेत. एकीकडे नागरिकांना मलब्याच्या गोण्या आणि दुसरीकडे मलईच्या गोण्या कंत्राटदाराकडे हे विदारक चित्र मुंबईकरांसमोर येत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. जिथे पाणी तुंबत नाही, त्या ठिकाणी देखील पाणी तुंबलंय”, असं आशिष शेलार म्हणाले आहेत. “आता तरी मुंबईकरांची काळजी घ्या”, असं आवाहन देखील त्यांनी ट्वीटमधून सत्ताधाऱ्यांना केलं आहे.

 

मुंबईची पहिल्याच पावसात तुंबई!

बुधवारपासून पुढील चार दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार मुंबई आणि उपनगरांत सोमवारी रात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरूवात झाली. दुपारपर्यंत अनेक भागांत पावसाचा जोर कायम होता. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये म्हणजेच, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये दमदार पाऊस झाला. तर मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु होती. अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं. त्यामुळे मुंबईत १०० टक्क्यांच्या वर नालेसफाई झाल्याच्या दाव्यांचं काय झालं? असा सवाल मुंबईकरांना पडला आहे.