अनंतचतुर्दशीला राज्यात जोरदार पावसाची शक्यता; मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास!

गेल्या अनेक दिवसांपासून किरकोळ हजेरी लावून गायब होणारा पाऊस आता अनंतचतुर्दशीपासून जोरदार पुनरागमन करणार असल्याची सुवार्ता आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार उद्या, अनंतचतुर्दशीपासून पावसाला सुरुवात होऊन पुढील चार दिवस राज्यभरात पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भातील बहुतांश भागात सध्या जोरदार पाऊस पडत असून गुरुवारपासून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही तो सर्वदूर कोसळेल, असे वेधशाळेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, येत्या दोन-तीन दिवसांतच राजस्थानवरून मोसमी वारे परतण्यास सुरुवात होणार असल्याचेही वेधशाळेतर्फे सांगण्यात आले आहे.

दोन वर्षे दुष्काळात होरपळलेल्या राज्याला या वर्षी पावसाने चांगला हात दिला. श्रावणापासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी अधूनमधून येत असलेल्या सरींमुळे सरासरी कायम राहिली. आता पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात पावसाला अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. पश्चिम किनारपट्टीवरही कमी दाबाचा पट्टा आहे. या स्थितीमुळे कोकणासह राज्याच्या अंतर्गत भागातही जोरदार सरी येतील. मराठवाडा व विदर्भात पावसाला सुरूवात झाली असून गुरुवारी पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस पोहोचेल. त्यामुळे अनंतचतुर्दशीला गणपतीला निरोप देताना राज्यातील बहुतांश भागात पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत नंदुरबार, धुळे व भंडारा तसेच मराठवाडय़ातील हिंगोली, परभणी, उस्मानाबाद हे जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र सरासरीएवढा पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली तसेच कोकणातील रत्नागिरी जिल्ह्य़ात पावसाने सरासरीपेक्षा २० टक्क्य़ांहून अधिक कामगिरी केली. पुढील चार दिवसांची पावसाची शक्यता लक्षात घेता मुंबईत सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत ९७ टक्के पाणीसाठा आहे.

तलावात ९७ टक्के पाणीसाठा

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पाणीसाठय़ाची क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर आहे. आतापर्यंत सर्व तलावांमध्ये एकूण १४ लाख ५ हजार दशलक्ष लिटरवर पाणी जमा झाले आहे. हा साठा एकूण क्षमतेच्या ९७ टक्के असून पुढील वर्षभर पाणीकपातीतून मुंबईकरांची सुटका झाली आहे.