पाणी साचल्याने काही ठिकाणची लसीकरण केंद्रे बंद

मुंबई : बुधवारी पहाटेपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचून दैनंदिन जीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले. सध्या करोना रुग्णांची संख्या कमी असल्याने रुग्णसेवेवर मात्र त्याचा विशेष परिणाम झाला नाही. परंतु पाणी साचल्याने काही लसीकरण केंद्रे पालिकेने बुधवारी बंद केली.

करोनारुग्णांची संख्या सध्या कमी झालेली आहे. तसेच सकाळपासूनच पाऊस असल्याने बुधवारी सकाळी बह्य़रुग्ण विभागातही रुग्णांची विशेष गर्दी नव्हती. त्यामुळे पावसामुळे रुग्णसेवेवर विशेष परिणाम झालेला नाही, असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले. बऱ्याचशा रुग्णालयांमध्ये सकाळच्या वेळेतील कर्मचारी वेळेवर पोहचले. संततधारेमुळे मुंबईत जागोजागी पाणी साचल्याने त्याचा सार्वजनिक वाहतुकीवरही परिणाम झाला. त्यामुळे दुपारच्या वेळेतील कर्मचारी उशिराने पोहोचले. परंतु रुग्णांची संख्या कमी असल्यामुळे फारसा फरक पडलेला नाही, असे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

नायर रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पाणी साचल्याने रुग्णांना आणि कर्मचाऱ्यांना ये-जा करणे अडचणीचे झाले होते. गेले अनेक दिवस या भागात पाणी साचण्याचे प्रकार घडूनही पाण्याचा निचरा होण्यासाठी पालिकेकडून कोणत्याही ठोस उपाययोजना के ल्या गेल्या नाहीत.

प्रत्येक वेळेस आम्हा कर्मचाऱ्यांना याचा त्रास होतो, असे नायर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. पाणी साचल्यामुळे घाटकोपर विभागातील घाटकोपर पोलीस मैदान आणि डी. बी. पवार सभागृह येथील लसीकरण बुधवारी बंद केले गेले, तर भायखळा विभागातील हकीमनगर लसीकरण केंद्रही पावसाचे पाणी साचल्यामुळे बंद केले गेले.