मुंबईत ८८ ठिकाणी वेधशाळेची पर्जन्यजलमापके; संकेतस्थळ व अ‍ॅपद्वारे नागरिकांना अद्ययावत माहिती
उन्हाच्या काहिलीने मुंबईकरांना सध्या जीव नकोसा झाला असला तरी विविध शासकीय संस्था पावसाच्या तयारीत गुंतल्या आहेत. गेल्या वर्षी पावसाच्या पहिल्याच फटक्याचा अनुभव लक्षात घेता या वेळी महानगरपालिकेने हवामानशास्त्र विभागाच्या मदतीने शहरातील तब्बल ८८ ठिकाणी पर्जन्यजलमापके बसवली असून दर पंधरा मिनिटांनी पावसाची थेट माहिती देण्यासाठी संकेतस्थळ तसेच मोबाइल अ‍ॅप अद्ययावत केले जात आहे.
मुंबई ज्या अनेक कारणांसाठी ओळखली जाते त्यातील एक म्हणजे इथला मुसळधार पाऊस. एका तासात शहरातील सखल भाग जलमय करून वाहतूक व्यवस्था व पर्यायाने जनजीवन विस्कळीत करणाऱ्या पावसात पालिकेच्या कामगिरीची खरी परीक्षा होते. गेल्यावर्षी पहिल्याच पावसात पालिका या परीक्षेत सपशेल नापास झाली. हा धक्का देणारा अनुभव आणि आठ महिन्यांवर आलेली महानगरपालिका निवडणूक या पाश्र्वभूमीवर पालिका प्रशासन सर्वच आघाडय़ांवर प्रयत्नशील आहे. वेगवेगळ्या उपनगरांत सुरू असलेल्या पावसाची माहिती देणाऱ्या यंत्रणेची उभारणी करण्याच्या उपक्रमाचीही साथ प्रशासनाला मिळाली आहे.
मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी पावसाचा जोर समान नसतो. सखल भागात अधिक पाऊस पडल्यास तसेच विशिष्ट उपनगरात जोरदार सर आल्यास तिथे पाणी साचते. अशा वेळी तिथे जाणाऱ्या मुंबईकरांना याची कल्पना यावी तसेच पालिकेच्या यंत्रणाही सतर्क होऊन जनजीवनावर कमीतकमी परिणाम होण्याच्या उद्दिष्टाने ही यंत्रणा कार्यरत होत आहे.
शहराच्या सर्व विभागांत प्रत्येकी एक याप्रमाणे वेधशाळेकडून स्वयंचलित हवामान केंद्रे उभारली गेली आहेत. त्यामध्ये हवेचा दाब, वाऱ्याची दिशा व वेग, तापमान तसेच पावसाची नोंद करण्याची यंत्रणा कार्यान्वित आहे. या यंत्रणेतील नोंदींची जबाबदारी वेधशाळेकडे आहे. मात्र यासाठी पालिकेने जागा तसेच देखभालीची जबाबदारी उचलली असून पालिकेच्या सहकार्याने ही माहिती मुंबईकरांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. सफर प्रकल्पांतर्गत यापूर्वीच दहा ठिकाणच्या प्रदूषणाची माहिती मिळत आहे. हे त्याच्या पुढचे पाऊल असून अधिकाधिक सामान्याभिमुख होण्याचा तसेच हवामानाच्या विस्तृत नोंदी घेण्याचा हा प्रयत्न आहे, असे मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.

’ पालिकेने यापूर्वी ५८ ठिकाणी ६० पर्जन्यजलमापके बसवली आहेत. यातील बहुतांश पर्जन्यजलमापके अग्निशमन केंद्राच्या परिसरात आहेत.
’ या जलमापकांच्या नोंदी मध्यवर्ती केंद्राकडे येऊन त्यानंतरdm.mcgm.gov.in हे संकेतस्थळ तसेच disaster management mcgm या मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जातात.
’ यावर्षी त्यात मुंबई हवामानशास्त्र विभागाकडून बसवण्यात आलेल्या २८ पर्जन्यमापकांची भर पडली आहे.