सखल भाग जलमय; पालिकेच्या नालेसफाईबाबत प्रश्नचिन्ह
गेले चार महिने उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या मुंबईकरांना शनिवारी सकाळी दमदार हजेरी लावलेल्या पावसाने दिलासा दिला. मात्र, पहिल्या पावसातच मुंबईमधील काही सखल भाग पाण्याखाली गेले आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही पालिकेच्या नालेसफाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गेले चार महिने उकाडय़ाने असह्य़ झालेले मुंबईकर पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करीत होते. अखेर शनिवारी सकाळी पावसाने दमदार हजेरी लावत मुंबईकरांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम दिला. पावसामुळे हवेत सुखद गारवा निर्माण झाला होता. सकाळी १० नंतर पावसाने विश्रांती घेतली. पण दिवसभर आभाळ भरून आल्यामुळे मुंबईत गारवा कायम होता. कामावर जाण्यासाठी सकाळीच घराबाहेर पडलेल्या अनेक मुंबईकरांची पावसामुळे धावपळ उडाली. पण उन्हाच्या काहिलीतून सुटका झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. शनिवारी सकाळी ८ ते दु. २.३० या काळात कुलाबा येथे ३.५ मि.मी., तर सांताक्रूझ येथे ३६.६ मि.मी. पावसाची नोंद झाली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यापूर्वी मुंबईमधील छोटय़ा-मोठय़ा नाल्यांची सफाई करण्यात आली. मात्र पहिल्याच पावसामुळे भेंडीबाजार, धारावी, माहीम, वांद्रे, अंधेरी, मरोळ, विलेपार्ले, कुर्ला, मुलुंड यासह अनेक भागातील सखल भाग जलमय झाले. काही ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्यांची योग्य प्रकारे सफाई न झाल्यामुळे रस्ते जलमय झाले.
त्याचा फटका मुंबईकरांना सहन करावा लागला. नाल्याकाठी, तसेच रस्त्यांमध्ये पाणी तुंबल्याचे समजताच पालिकेच्या विभाग कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी धाव घेत सखल भागात बसविलेले पंप कार्यान्वित केले. त्यामुळे काही वेळातच पाण्याचा निचरा झाला. काही ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्यांच्या जाळ्यांमध्ये अडकलेला कचरा हटविण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांना धावपळ करावी लागली. परिणामी, जलमय झालेल्या रस्त्यांवरील वाहतूक काही काळ अन्य मार्गाने वळविण्याची वेळ आली होती.
पाणी तुंबलेली ठिकाणे
जे जे पुलाखाली मोहम्मद अली रोड; कुर्ला कमानी; एमआयडीसी, अंधेरी; भगवानदास चाळ, अशोकनगर, मरोळ; लालबहाद्दूर नगर, मुलुंड; घासबाजार, वांद्रे; सहार व्हिलेज; धारावी; माहीम कॉजवे; संत रोहिदास चौक, माहीम; शांतीनगर, वांद्रे.