अंबरनाथ, बदलापूरमध्येही सरी; राज्यात आजही पावसाची शक्यता

अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हामुळे हैराण झालेल्या मुंबई आणि ठाणेकरांना रविवारी सायंकाळी झालेल्या हलक्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. मुंबईत बोरिवली, मालाड आणि ठाण्यातील कळवा, खारेगाव, घोडबंदर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड आदी परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या.

येत्या २४ तासांत वातावरण ढगाळ राहणार असून सोमवारी संध्याकाळीही पावसाच्या हलक्या सरी पडतील. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा आणि गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि परिसरात वाहणारे चक्राकार वारे तसेच निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे राज्यात पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाल्याचा अंदाज हवामान विभागाने शनिवारी वर्तवला होता. तो खरा ठरला. रविवारी सकाळपासूनच मुंबई आणि ठाणे परिसरात ढगाळ वातावरण होते. दुपारी उन्हाचा तडाखा बसू लागला. परंतु संध्याकाळी चारच्या सुमारास गार वारा वाहू लागल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला होता. सायंकाळनंतर मुंबई आणि ठाणे शहराबरोबरच जिल्ह्य़ातील काही पावसाच्या हलक्या सरी झाल्या.

ठाण्यातील कळवा, खारेगाव आणि घोडबंदर या भागात रात्री विजेच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. उकाडय़ाने हैराण झालेल्या अंबरनाथ आणि बदलापुरातील नागरिकांनाही अवकाळी पावसाने दिलासा दिला. संध्याकाळी साडे सातच्या सुमारास अंबरनाथ आणि बदलापुरात पावसाला सुरुवात झाली. मुरबाड, वांगणी आणि उल्हासनगर भागालाही पावसाने भिजवले. अवचित आलेल्या पावसाने घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडवली. बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. दोन्ही शहरांच्या अनेक भागांत रात्री उशिरापर्यंत विजेचा लपंडाव सुरू होता.

गेल्या १५ दिवसांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. परंतु रविवारच्या हलक्या पावसामुळे कमाल तापमान दोन अंश सेल्सिअसने घटले. सोमवारचे तापमान मात्र ३५ अंश सेल्सिअसवर जाण्याचा अंदाज आहे. रविवारी सांताक्रूझ येथे ३४.५ अंश सेल्सिअस तर कुलाबा येथे ३३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात वादळी पाऊस, गारपीट

पुणे : अरबी समुद्रातून सध्या बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात ढगाळ हवामानाची स्थिती आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे सोमवारी त्या भागांत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस तसेच गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील सातारा, महाबळेश्वर, कोल्हापूर, सोलापूर, पुणे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्य़ात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. तर काही ठिकाणी गारपीटही झाली. राज्यात अजून दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. १५ एप्रिलसह १६ एप्रिललाही विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारी चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४५.० अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ आदी ठिकाणीही तापमान  ४३ ते ४५ अंशांच्या आसपास आहे. मराठवाडय़ातही परभणी, नांदेड, बीड आदी ठिकाणी ४२ ते ४३ अंश कमाल तापमान आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, मालेगाव, जळगाव आदी ठिकाणचे तापमान ४२ ते ४३ अंशांवर आहे. कोकणात रत्नागिरीचे कमाल तापमान ३५ अंशांवर आहे.

नाशिकमध्ये वीज कोसळून चार ठार

नाशिक जिल्ह्यासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने रविवारी तिघांचा बळी घेतला. दिंडोरी तालुक्यातील मानोरी येथे सायंकाळी क्रिकेट खेळणाऱ्यांवर वीज कोसळून तीन जण ठार झाले. अनिल गवे (३२), सागर गवे (१७), रोहित गायकवाड (१८) ही त्यांची नावे आहेत. चांदवडमधील जनाबाई रजाने या महिलेचाही वीज कोसळून मृत्यू झाला.