आणखी आठवडाभर प्रतीक्षा; मराठवाडां-विदर्भात परिस्थिती खालावलेली

गेल्या दोन आठवडय़ांपासून राज्यातील बहुतांश भागावर रुसलेला पाऊस आणखी आठवडाभर तरी परतणार नसल्याची शक्यता आहे. गेल्याच आठवडय़ात नाशिकचा अपवाद वगळता राज्यात इतरत्र केवळ पावसाचा शिडकावाच झाला. कोकण व पश्चिम महाराष्ट्रातही सरासरीच्या पन्नास टक्क्य़ांपेक्षाही कमी पाऊस पडला असून मराठवाडा आणि विदर्भात तर परिस्थिती आणखीनच खालावलेली आहे. सुरुवातीला या दोन्ही विभागांत पावसाने कृपावृष्टी केली परंतु नंतर पाठच फिरवल्याने जलसाठे आटत चालले आहेत.

मोसमी वारे सध्या हिमाचल प्रदेश, ओरिसा, केरळ व अरुणाचल प्रदेश यादरम्यान प्रभावी आहेत. त्यामुळे उत्तर भारत, ईशान्य भारत व दक्षिण भारतातील केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील पाच दिवस हा प्रभाव कमी जास्त प्रमाणात राहील. राज्यात मात्र पावसाने विश्रांती घेतलेली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पालघर येथे पावसाच्या सरी अधूनमधून येतात. ठाणे, रायगड व मुंबईत मंगळवारपासून मध्यम स्वरुपाच्या सरी येण्याचा अंदाज आहे. कोकण वगळता इतरत्र मात्र पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या सरी येतील मात्र मराठवाडा व विदर्भ येथे पावसाच्या सरींची फारशी शक्यता नाही. पावसाचे दोन महिने उलटले असून राज्यातील ३६ पैकी फक्त दहा जिल्ह्य़ांतच सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

नाशिक, पुणे, अहमदनगर, ठाणे व पालघर या पाच जिल्ह्य़ांत २० टक्क्य़ांहून अधिक पाऊस पडला. त्याचवेळी मराठवाडा व विदर्भातील बहुतांश जिल्ह्य़ात ६० ते ७० टक्के पाऊस पडला आहे. यावर्षी राज्यात १०० टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला होता.

भारतीय हवामानशास्त्र

विभागाच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या सरी येतील मात्र मराठवाडा व विदर्भ येथे पावसाच्या सरींची फारशी शक्यता नाही. पावसाचे दोन महिने उलटले असून राज्यातील ३६ पैकी फक्त दहा जिल्ह्य़ांतच सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.