शहरात दहा दिवसांत केवळ ८० मिमीची नोंद

शहरात गेल्या दहा दिवसात श्रावणाप्रमाणे उन पावसाचा खेळ सुरू असून केवळ ८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात शहरात सरासरी ८०० मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र जुलैचे पहिले चार दिवस वगळता पावसाने विश्रांती घेतली आहे.

दोन दिवसानंतर कोकण परिसरात पुन्हा एकदा पावसाच्या मध्यम सरींचा सुरुवात होईल असा वेधशाळेचा अंदाज आहे. राज्यात इतरत्र मात्र पुढील पाच दिवसात काही ठिकाणी तुरळक सरी येतील.

जून महिनाअखेर सांताक्रूझ येथे तब्बल ७६६ मिमी तर कुलाबा येथे ५८५ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर जुलैच्या पहिल्या चार दिवसातही अनुक्रमे २४१ मिमी व १५८ मिमी पाऊस पडला. त्यानंतर मात्र पावसाने ओढ दिली. गेल्या दहा दिवसात अवघा ७७ मिमी पाऊस पडला आहे. आतापर्यंत जुलैमध्ये ३१८ मिमी पाऊस झाला असला तरी जुलै महिन्यातील सरासरीच्या तुलनेत तो कमी आहे.

मात्र मोसमी पाऊस हा टप्प्याटप्प्यात पडत असल्याने यानंतरही पावसाची सरासरी भरून निघू शकते, असे हवामानशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान राज्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण केलेल्या पाऊस आता शांत झाला आहे. सोमवारपासून कोकणात मध्यम स्वरुपाच्या सरी येणे अपेक्षित असून राज्याच्या इतर भागात मात्र केवळ तुरळक सरी येतील, असा अंदाज आहे.

तलावात सात लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा

शहराला पाणीसाठा करणाऱ्या तलावांमध्येही पावसाने ओढ दिली असली तरी गेल्या आठवडय़ात पडलेल्या मुसळधार पावसामुळे एकूण पाणीसाठा सात लाख दशलक्ष लिटरपर्यंत वाढला आहे. शहराला वर्षभरासाठी १३ लाख दशलक्ष लिटर पाणी लागते. त्यातील पन्नास टक्क्य़ांहून अधिक पाणीसाठा तलावात जमा झाला असला तरी २० टक्के पाणीकपात रद्द करण्यात आलेली नाही. यामुळे तलावक्षेत्रात आणखी पाऊस पडणे आवश्यक आहे.