गेले दोन दिवस आकाशात भरून राहिलेल्या ढगांनी मुंबई व परिसरातील उपनगरात मंगळवारी सकाळी शिडकावा केला. तर मराठवाडय़ात गारांसह पावसाने जोरदार हजेरी लावली.

कोकण, मराठवाडा ते विदर्भापर्यंत एका पट्टय़ात ढगांनी गर्दी केली होती. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी आल्या. मुंबईतही काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला मात्र पर्जन्यमापकात त्याची नोंद झाली नाही. सांताक्रूझ आणि कुलाबा येथे अनुक्रमे ३२.१ अंश से. व ३०.१ अंश से. कमाल तापमानाची नोंद झाली.

मराठवाडय़ातील वातावरणात मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने हजेरी लावल्याने थंडावा निर्माण झाला. उस्मानाबाद जिल्ह्य़ातील कळंब शहरासह तालुक्यातील काही गावांमध्ये दुपारी दोनच्या सुमारास गारांचा पाऊस झाला, तर बीड जिल्ह्य़ातही ठिकठिकाणी दुपारनंतर अवकाळी पावसाने वादळ वाऱ्यासह हजेरी लावली. काही ठिकाणी आंब्याचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.

उत्तर महाराष्ट्रात वीज पडून एक ठार

मंगळवारी जळगाव जिल्ह्य़ाच्या काही भागांत मुसळधार पाऊस झाला. भुसावळ येथे वीज पडून तरुण जागीच ठार झाला. नाशिक जिल्ह्य़ातही पावसाने तुरळक हजेरी लावली. भुसावळ येथील पंचशील नगरात मुले क्रिकेट खेळत असतानाच विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यातच वीज पडून अश्रफ शहा अल्लबक्ष शहा (१९) हा जागीच ठार झाला.