राज्यात ऐन हिवाळ्यात ढगांचे मळभ दाटले असू मुंबईसह राज्याच्या काही भागांत मंगळवारी पाऊस पडला. हिवाळ्यातील या पावसामुळे थंडीने काढता पाय घेतला असून किमान तापमानातही बरीच वाढ झाली आहे. आणखी दोन दिवस तरी ही परिस्थिती कायम राहणार असल्याचे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याचीही चिन्हे आहेत.
अरबी समुद्र आणि उत्तर भारतात निर्माण झालेल्या हवामानामुळे ऐन थंडीच्या दिवसात ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे. सोमवारी सकाळपासून सर्वत्र ढगांचे दाट आवरण होते.
विशेषत: उत्तर महाराष्ट्र व उत्तर कोकणात त्याचा प्रभाव जास्त होता. मुंबई, नाशिक व इतर काही भागात पावसाच्या सरी पडल्या. ढगांमुळे थंडी कमी झाली व रात्रीच्या तापमानात वाढ झाली. त्याच वेळी दुपारचे तापमान काही प्रमाणात खाली उतरले.
हे वातावरण आणखी दोन दिवस कायम राहील असे पुणे वेधशाळेचे संचालक डॉ. पीसीएस राव यांनी सांगितले.     

मुंबईत पाऱ्याची उसळी ; किमान तापमानात मोठी वाढ
गुलाबी थंडी लपेटून येणाऱ्या पहाटेचा अनुभव घेणाऱ्या मुंबईकरांच्या भेटीला मंगळवारी पावसाचा शिडकावा आला. किनारपट्टीजवळ हवेत निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि उत्तरेकडून येणारे बाष्पयुक्त थंड वारे या दोहोंच्या परिणामामुळे जानेवारीत आलेला पाऊस ही अगदीच दुर्मीळ घटना नसल्याचे वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ढगाळ वातावरणामुळे शहराच्या किमान तापमानात वाढ झाली. शनिवारी १३.२ अंश सेल्सियसपर्यंत घसरलेला पारा मंगळवारी २१.१ अंश सेल्सिअसवर पोहोचला.
या मोसमात उत्तरेकडून तसेच पूर्व दिशेने वारे वाहत असतात. या वाऱ्यांच्या प्रभावाने मराठवाडा तसेच विदर्भात पावसाच्या काही तुरळक सरी पडतात. मात्र हे वारे पश्चिमेकडे येईपर्यंत विरळ होत जातात. यावेळी पश्चिम किनारपट्टीवर लक्ष्वदीप बेटांपासून आग्नेय राजस्थानपर्यंत कमी दाबाचे क्षेत्रफळ निर्माण झाले होते. त्याचवेळी उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे गुजरात, राजस्थानमध्ये पाऊस पडला. हे बाष्पयुक्त वारे राज्याच्या उत्तर भागातही पोहोचले. या दोन्हीच्या एकत्रित परिणामामुळे मुंबई, ठाण्यासह कोकण, पश्चिम व मध्य महाराष्ट्र येथे ढगाळ वातावरण होते. मुंबईसह ठाणे व नवी मुंबईत मंगळवारी सकाळी पावसाच्या तुरळक सरी पडल्या, असे मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी सांगितले.

मुंबईत जानेवारीत आलेला यापूर्वीचा पाऊस
*  २२ जानेवारी २००४  ल्ल ३१ जानेवारी २००५
* २९ आणि ३० जानेवारी २००७

ढग व पाऊस कशामुळे?
*अरबी समुद्रात लक्षद्वीपपासून गुजरातपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
*उत्तर भारतात पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव दक्षिणेला सरकला.
*पूर्व व पश्चिमेकडून येणारे बाष्पीकृत वारे परस्परांना छेद देत आहेत.
* या सर्व घटकांमुळे बाष्पनिर्मिती होऊन पाऊस पडत आहे.