News Flash

मुंबईसह कोकणपट्टीत हलक्या पावसाचा शिडकावा

राज्यात चार दिवस अवकाळीचा अंदाज

(संग्रहित छायाचित्र)

गेले काही दिवस रखरखीत उन्हाने तप्त झालेल्या मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणपट्टीच्या काही भागांत गुरुवारी सकाळी पावसाचा हलका शिडकावा झाला. पुढील काही दिवस मुंबईसह संपूर्ण कोकणात आकाश ढगाळ असेल. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह््यांच्या काही भागांत मेघगर्जनेसह वादळी पावसाचीही शक्यता आहे.

राज्यावर पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्याच्या सर्वच भागांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस कोसळेल, असा इशारा देण्यात आला आहे. वायव्येकडून येणारे कोरडे वारे आणि हवेत वाढलेली आद्र्रता यांमुळे मुंबईसह किनारपट्टीच्या भागांत पावसाने हजेरी लावली. कु लाबा येथे गुरूवारी सकाळी ८७ टक्के  तर सायंकाळी ८१ टक्के  आद्र्रता नोंदवली गेली. तसेच सांताक्रूझ येथे सकाळी ७६ तर सायंकाळी ६७ टक्के  आद्रतेची नोंद झाली. कु लाबा आणि सांताक्रूझ येथे गुरूवारी ३२.६ अंश सेल्सिअस कमाल आणि अनुक्रमे २६ आणि २४.७ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. तापमान सर्वसाधारण असले तरीही वाढलेल्या आद्र्रतेमुळे गुरूवारी सकाळपासूनच उष्णता जाणवत होती; मात्र दिवसभर हवामान ढगाळ होते.

आकाश ढगाळ

आद्र्रतेमुळे ढग निर्माण झाल्याने मुंबई परिसरात काही प्रमाणात पावसाचा शिडकावा झाला. सायंकाळी हवेत थंडावा जाणवत होता. पुढील तीन-चार दिवस आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली.

पावसाचे कारण काय ?

सध्या पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लगतच्या भागापासून पूर्व विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तो राज्याच्या इतर ठिकाणीही सरकू शकतो. परिणामी पुढील चार दिवस राज्यातील सर्वच विभागांत कमी-अधिक प्रमाणात अवकाळीची शक्यता आहे. कोकण विभागात १० एप्रिलपर्यंत तुरळक ठिकाणी हलका आणि त्यानंतर दोन दिवस काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 12:31 am

Web Title: rains again over the state abn 97
Next Stories
1 ‘पोक्सो’ प्रकरणांच्या प्रत्येक घडामोडीची माहिती पीडितांच्या पालकांना देणे अनिवार्य
2 दिशाभूल करण्याचा प्रयत्न-फडणवीस
3 लसटंचाई
Just Now!
X