वरूणराजाचे राज्यभरात पुनरागमन झाल्याने सगळेच जण सुखावले आहेत. मुंबईसह राज्यभरातल्या बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर हवामान खात्याने कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून ढगांची गर्दी बघायला मिळत होती, पाऊस पडला तरीही तुरळक सरी कोसळून मग निघून जात होता. मात्र रात्रभरापासून मुंबई आणि उपनगरात चांगला पाऊस झाला. पवई, ठाणे, मुलुंड या भागात अधूमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. वसई आणि पालघर या ठिकाणीही चांगला पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील मुरुड, श्रीवर्धन, अलिबाग या ठिकाणीही पाऊस कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

कोकणात रत्नागिरीसह सिंधुदुर्ग भागातही मुसळधार पाऊस झाला आहे. येत्या २४ तासात या ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. वेंगुर्ला, मालवण आणि राजापूर या ठिकाणी असलेल्या गावांमध्येही पावसाची कोसळधार सुरुच होती. सोलापुरातही पावसाने रजा घेतली होती. मात्र शुक्रवारी रात्री पाऊस बरसल्याने सोलापूरकरही सुखावले आहेत. एवढेच नाही तर नाशिमध्येही पावसाने हजेरी लावली आहे. नाशिकमध्ये आजही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.