२५-२६ जूनला सर्वाधिक उंचीची भरती

मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भरतीचे १८ दिवस असतील. जूनअखेरीस सलग सहा दिवस मोठी भरती असेल. २५ आणि २६ जूनला सर्वाधिक उंचीची भरती असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबईत मोठ्या भरतीच्या वेळी अतिपर्जन्यवृष्टी होऊन पाणी तुंबण्याची शक्यता असते. यंदाही पावसाळ्यात १८ दिवस अधिक उंचीची भरती येणार आहे. पंचागकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ ते २८ जून सलग सहा दिवस मोठ्या भरतीचे असणार आहेत. २५ आणि २६ जून रोजी सर्वाधिक उंचीची भरती येणार असून त्यांची उंची ४.८५ मीटर इतकी असेल. तर २३ ते २७ जुलै या पाच दिवसांच्या कालावधीतही मोठी भरती येणार आहे. २५ जुलै रोजी, जुलै महिन्यातील ४. ७३ मीटर उंचीची सर्वाधिक मोठी भारती येईल. ऑगस्टमध्ये पाच तर सप्टेंबरमध्ये दोन दिवस मोठ्या भरतीचे असतील. तसेच ही उंची लाटांची नसून भरतीच्या पाण्याची आहे, असे सोमण यांनी स्पष्ट केले आहे.