अश्लील चित्रपटांची निर्मिती आणि प्रसारणाच्या प्रकरणामध्ये अटकेत असणारे अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन मोबाइल अ‍ॅप्सच्या माध्यमातून त्यांचा प्रसार केल्याचा आरोप कुंद्रांवर आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने फेब्रुवारीमधील एका कारवाईच्या आधारे अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन अ‍ॅपवरुन ते प्रदर्शित करण्याच्या या रॅकेटमध्ये कुंद्राच मुख्य सुत्रधार असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये चौकशी सुरु असतानाच आता मुंबई पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टीला अद्याप क्लीन चीट देण्यात आलेली नाही असं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> राज कुंद्रा प्रकरण : “सनी लिओनी तर असल्या उद्योगांची क्वीन, तिला अटक करुन जन्मठेपेची शिक्षा द्या”

या प्रकरणासंदर्भातील तपासासाठी कुंद्रा यांच्या पोलीस कोठडीमध्ये सात दिवसांनी वाढ करावी अशी मागणी मुंबई पोलिसांनी केलेली. मात्र न्यायालयाने मुंबई पोलिसांची मागणी फेटाळून लावत कुंद्रांना न्यायालयीन कोठडी सुनावली. एएनआय या वृत्त संस्थेशी बोलताना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पॉर्नोग्राफीच्या या प्रकरणामध्ये पोलिसांनी अद्याप शिल्पा शेट्टीला क्लीन चीट दिलेली नाही असं स्पष्ट केलं आहे. सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जाणार आहेत असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. सर्व दृष्टीकोन लक्षात घेऊन तपास केला जाणार आहे. फॉरेन्सिक ऑडिटर्सची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये सर्व खात्यांमधील व्यवहारांची तपासणी  सुरु आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे.

नक्की पाहा >> कंडक्टरचा मुलगा, हिरे व्यापारी, शिल्पा शेट्टीशी लग्न ते पॉर्न प्रकरण; राज कुंद्रांबद्दलच्या ३० खास गोष्टी

तसेच या प्रकरणामध्ये राज कुंद्रा यांच्या विहान इंडस्ट्रीजसोबत काम केलेल्या अन्य दिग्दर्शकांनाही त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी गरजेप्रमाणे बोलवण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. अभिनेत्री शर्लीन चोप्राला साक्षीदार म्हणून जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

नक्की वाचा >> “राज कुंद्राच्या हॉटशॉट्स App साठी काम केल्याने नवऱ्याने तिला घटस्फोट दिला”

या प्रकरणामध्ये प्रदीप बक्षी (म्हणजेच राज कुंद्रांचा मेहुणा) याच्या नावाखाली कुंद्राच हॉटशॉट्सचे सर्व व्यवहार पाहत होते अशी शंका पोलिसांना आहे. कुंद्रांच्या अटकेनंतर अनेकांनी पुढे येऊन त्यांच्याविरोधात पोलिसांकडे जबाब नोंदवलाय, असंही पोलीस म्हणालेत.

या प्रकरणामधील आरोपी अरविंद्र श्रीवास्तव म्हणजेच यश ठाकूरची बँकखाती गोठवण्यात आली आहेत. यामध्ये सहा कोटी रुपये आहेत. यश ठाकूरने यासंदर्भात मुंबई पोलिसांना पत्र लिहून खात्यांवरील कारवाई मागे घ्यावी अशी विनंती केलीय. मात्र मुंबई पोलिसांनी यश ठाकूरने पोलिसांसमोर येऊन तपासाला सहकार्य करावं असं त्याला कळवलं असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलीय.

दिलासा देण्यास न्यायालयाचा नकार

अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी झालेली अटक बेकायदा असल्याचा दावा करत व्यावयासिक कुंद्रांनी केलेल्या याचिकेवर पोलिसांचे म्हणणे ऐकल्याशिवाय कोणताही तातडीचा दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. कुंद्रा यांच्या याचिकेवर पोलिसांना उत्तर दाखल करण्याचे आदेश देत न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी याचिकेवरील सुनावणी गुरुवारी ठेवली. पोलिसांनी अटकेपूर्वी कुंद्रा यांना नोटीस देणे अनिवार्य होते. मात्र पोलिसांनी त्यांना थेट अटक केल्याचा आरोप कुंद्रा यांच्यातर्फे करण्यात आला. कुंद्रा यांना अटकेपूर्वी नोटीस देण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला.