भाजप आमदार राज पुरोहित यांनी पोलिसांना हिणवले

कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढीस लागलेले असताना सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे आमदार राज पुरोहित यांनी पोलिसांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीची घटना समोर आली आहे. पोलिस ठाण्यापुढे गाडी उभी करण्यास आमदार पुरोहित यांना मज्जाव करण्यात आला असता, ‘भेंडीबाजारात अशी कारवाई करण्याची हिंमत आहे का?’, अशा शब्दांत त्यांनी पोलिसांना हिणवले. पुरोहित यांनी शिवीगाळ केल्याचे कनिष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांचे म्हणणे असून, ‘माझी पोलिसांशी बाचाबाची झाली, पण मी शिवीगाळ केली नाही’, असा पवित्रा पुरोहित यांनी घेतला आहे.

कुलाब्याचे आमदार असलेले राज पुरोहित शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पिकेट रोड येथील हनुमान मंदिरात गेले होते. या मंदिरासमोर लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे आहे. या ठाण्याच्या प्रवेशद्वाराशी गाडी उभी करण्याचा प्रयत्न पुरोहित यांच्या गाडीचा चालक करीत होता. त्यावेळी पोलिस ठाण्यातून एक हवालदार आला. ‘येथे गाडी उभी केल्यास वाहतूककोंडी होईल, त्यामुळे दुसरीकडे गाडी उभी करा’, असे त्याने चालकाला सांगितले. त्यावर, ‘येथे दोन गाडय़ा उभ्या राहतील, इतकी जागा असताना मनाई का केली जात आहे’, असे पुरोहित यांनी विचारले. त्यावरून हवालदार व पुरोहित यांच्यात वाद झाला. त्यावेळी पुरोहित यांनी पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

वाद कमी पडला म्हणून की काय, पुरोहित यांनी गाडी पोलीस ठाण्याच्या आवारात नेण्यास सांगितले. तेथे काही पोलिसांनी प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र पुरोहित यांचा पारा चढलेलाच होता. रस्त्यावरून एक मोटरसायकलस्वार चुकीच्या मार्गिकेने गेल्याकडे बोट दाखवत, ‘या लोकांनी नियम मोडलेले चालतात. पण माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींना तुम्ही नियम शिकवता’, असे बोल त्यांनी पोलिसांना लावले. ‘भेंडीबाजारात अशी कारवाई करण्याची हिंमत आहे का तुमच्यात. तिथे काही थांबवता येत नाही आणि इथे आम्हाला दम देता’, अशा शब्दांत त्यांनी शब्दांचा दांडपट्टाच सोडला. वाद वाढत चालल्याने पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटवले. दरम्यान, या घटनेविषयी कोणतीही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली नसून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

‘होय मी तसे बोललो’

घडलेल्या प्रकाराविषयी आमदार राज पुरोहित यांच्याशी ‘लोकसत्ता’ने संपर्क साधला असता, ‘गाडी उभी करण्यावरून हवालदाराने निष्कारण वाद घातल्याने आपली बाचाबाची झाली’, असा पवित्रा त्यांनी घेतला. ‘पोलिसांनी लोकप्रतिनिधींचा मान ठेवायलाच हवा. भेंडीबाजारसारख्या परिसरात तुम्हाला काही कारवाई करता येत नाही. लोकप्रतिनिधींशी मात्र हुज्जत घालता, असे मी त्यांना म्हणालो’, अशी कबुलीही त्यांनी दिली. ‘मात्र मी पोलिसांना शिवीगाळ केलेली नाही’, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

काय म्हणाले आमदार पुरोहित?

.. या लोकांनी नियम मोडलेले चालतात आणि माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींना तुम्ही नियम शिकवता. भेंडीबाजारात अशी कारवाई करण्याची हिंमत आहे का तुमच्यात? तिथे काही थांबवता येत नाही तुम्हाला.