दुष्काळाबाबत पोरखेळ करणाऱ्या महाराष्ट्र सरकारला अखेर न्यायालयाने तंबी दिल्यानंतर सरकारने २९,६०० गावात दुष्काळ जाहीर केला. दुष्काळग्रस्त जनता पोळून निघत असतानाही सरकार झोपलेले होते. आता न्यायालयाने झटका दिल्यानंतर तरी ठोस कारवाई करा, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मदत मिळत नसल्यास मनसेकडे संपर्क साधा असेही राज यांनी म्हटले आहे. राज्यातील जवळपास पंचाहत्तर टक्के जनता दुष्काळाच्या खाईत सापडली असताना राज्य शासन केवळ शाब्दिक खेळ करीत होती. योग्य वेळी दुष्काळ जाहीर करायला यांचे हात कोणी बांधले होते, असा सवालही राज यांनी केला.शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे, पीक कर्जाची वसुली थांबवणे तसेच शेतकऱ्यांना वीजबिलात सूट दिली पाहिजे, असे राज यांनी पत्रकात म्हटले आहे. जर शेतकरी अथवा नागरिकांना शासनाकडून योग्य मदत मिळत नसेल तर तर ०२२-४३३३६९९ या दूरध्वनीवर माहिती दिल्यास मनसे मदतीसाठी उभी राहील, असे आश्वासन राज यांनी दिले आहे.