महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला चित्रपटाचं वेड नाही. त्याला नाटकांच वेड आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी मोठी आहे असे मुलुंड येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्धाटन सोहळयात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. नाटक भरपूर येत आहेत पण ती चालतात किती हे महत्वाच आहे असे राज म्हणाले. नाटय निर्मिती करुन पोट भरण चांगल पण काही जण तारखा विकण्यासाठी नाटक कंपन्या काढतात हे दुर्देव आहे असे राज ठाकरे म्हणाले.

नाटय संमेलनात जी भव्यता दिसते ती नाटकात का नाही दिसत ? असा सवाल त्यांनी केला. भव्यता आणि संहिता एकत्र आले तर नक्कीच मराठी माणूस नाटकांकडे वळेल असे राज म्हणाले. मराठी नाटय संस्कृतीला मोठा इतिहास असल्याचे राज म्हणाले. ५ हजार रुपये भरुन मोगले आझम नाटक बघायला जाणारा मराठी माणसू दर्जेदार नाटक असेल तर ते पाहायला का येणार नाही? असा सवाल राज यांनी केला.

मराठी नाटकामध्ये सुद्धा भव्यपणा आला पाहिजे तरच प्रेक्षक मराठी नाटकाकडे येईल. मग चार पैसे जास्त भरायला लागले तरी त्याची हरकत असणार नाही. थिएटरची बाथरुम स्वच्छ नसतात त्यावरुन टीका केली जाते पण नाटकाला चांगली गोष्ट आवश्यक आहे त्याच काय ?नाटकाला वाढवा, मोठ करा, भव्यता येऊ दे. तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे असे राज म्हणाले.

मुलुंडच्या महाकवी कालिदास नाट्यगृहात हे संमेलन पार पडत आहे. दिमाखदार नाट्य दिंडीने या संमेलनाची सुरुवात झाली. यंदा नाट्यसंमेलनाचं यजमानपद भुषवण्याची संधी मुलूंडकरांना मिळाली असून, जवळपास २५ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंचतर हे संमेलन मुंबईत पार पडत आहे. मुलुंड रेल्वे स्थानकापासून ही दिंडी निघाली आणि यामध्ये ४०० लोककलावंत सहभागी झाले. मुलुंड रेल्वे स्थानकापासून सुरु झालेली ही नाट्यदिंडी एम.जी.रोड, पाच रस्ता मार्गातून पुढे कालिदास नाट्यगृहाजवळ पोहोचली.

नाट्यपरिषदेच्या फेसबुक पेजवरुन या संपूर्ण सोहळ्यातील क्षणचित्रे आणि व्हिडिओ पोस्ट करण्यात येत असून, त्या माध्यमातून रसिकांपर्यंत हा सोहळा पोहोचवण्यात येत आहे. नाट्यदिंडीचा नयनरम्य सोहळा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवण्यात आला.