मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे राजकारणापलिकडे मैत्री असलेले दोन मित्र. मात्र आज मुंबईत या दोघांमध्ये बघायला मिळाला तो राजकीय दुरावा. मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरीत विख्यात चित्रकार कै. प्रल्हाद धोंड यांच्या ‘धवलरेषा’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी राज ठाकरे आले होते. याच कार्यक्रमाला काही वेळाने आशिष शेलारही आले. मात्र या दोघांनी एकमेकाकडे पाहिलंही नाही. राज ठाकरे कार्यक्रमाला आले आहेत हे पाहून अवघ्या पाच ते सात मिनिटात आशिष शेलार यांनी जहांगीर आर्ट गॅलरीतून काढता पाय घेतला. एवढंच नाही तर या दोघांनीही या विषयावर प्रसारमाध्यमांशी बोलणंही टाळलं. असं असलं तरीही या दोघांमधला राजकीय दुरावा कॅमेराने टीपलाच.

राज ठाकरे यांनी ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दहा सभा घेतल्या. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना हटवा असं आवाहन केलं. ज्यानंतर आशिष शेलार यांनीही राज ठाकरेंवर टीका करण्याची संधी सोडली नाही. ‘शिवाजी पार्कच्या बाभळीला बारामतीची बोरं’ सोडून गेले नगरसेवक, सोडून गेले आमदार.. एकटे एकटे वाटले म्हणून स्वतःच्या काकांच्या नाही.. जाणत्या राजाला गाठले.. पाठीवर हात ठेवून, नव्या भाषणांची स्क्रिप्ट हाती देऊन बारामतीच्या काकांनी फक्त लढ असे म्हटले. असे काही ट्विट करून आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर शाब्दिक शरसंधान केले होते. मात्र महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांची एक परंपरा कायम दिसून आली आहे. ती अशी की सार्वजनिक कार्यक्रमात एकमेकांचे पक्के राजकीय वैरी असलेले लोकही एका मंचावर एकत्र येतात. आज मात्र जहांगीर आर्ट गॅलरीत झालेल्या कार्यक्रमात हे चित्र दिसलं नाही.

एकेकाळचे पक्के मित्र आता पक्के राजकीय शत्रू झाले की काय? असाच प्रश्न तमाम महाराष्ट्राला आजचं जहांगीर आर्ट गॅलरीतलं चित्र पाहून पडला असेल. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी एकमेकांशी बोलणे तर सोडाच एकमेकांकडे ढुंकूनही पाहिले नाही. विधानसभा निवडणूक जवळ येते आहे, अशात ही नेमकी कशाची नांदी आहे हे स्पष्ट व्हायचे आहे. दरम्यान आजच्या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रल्हाद धोंड यांच्यासोबत घालवलेल्या बालपणीच्या आठवणींना उजळा दिला. तसेच कलानगरमधल्या जुन्या मित्रमैत्रिणींची आणि स्नेहींचीही भेट घेतली.