कोणाचेही खाणं काढण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती आणि नाही. मात्र, माझ्यावर बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका होते. पाठीत खंजीर खुपसल्याचे बाळासाहेबांना वाटले असते, तर मी पाठवलेले सुप त्यांनी घेतलेच नसते. हे सांगण्यासाठीच मी जाहीर सभेमध्ये या गोष्टीचा उल्लेख केला. मातोश्रीवर बाळासाहेबांच्या खाण्याची आबाळ होत होती, असे सांगण्याचा माझा अजिबात उद्देश नव्हता, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी स्पष्ट केले.
‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीवरील ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत आपण चिकन सुपचा विषय का मांडला, याचा खुलासा केला.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकातून टाळीसाठी हात पुढे करण्यात आल्यानंतर मी त्यावर जाहीर सभेत माझी भूमिका मांडली. यानंतर माझ्यावर बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱयांशी कशाला बोलायचे, अशी टीका माझ्यावर शिवसेनेकडून करण्यात आली. जर मी पाठीत खंजीर खुपसल्याची भावना बाळासाहेबांच्या मनात असती, तर त्यांनी मी पाठवलेले सुप घेतले असते का, असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. मी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, असे बाळासाहेबांना कधीच वाटत नव्हते, म्हणूनच त्यांनी मी पाठवलेले सुप घेतल्याचे सांगण्यासाठीच मी तो विषय जाहीर सभेमध्ये मांडला, असेही त्यांनी सांगितले.