आमचे सरकार काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारपेक्षा वेगळे असेल, असे निवडणूक प्रचाराच्या वेळी भाजपचे नेते उच्चारवाने सांगत असत. खरेच हे सरकार आघाडी सरकारपेक्षा वेगळे आहे. भाजप सरकारच्या काळात मंत्रालयाचे ‘आत्महत्यालय’ बनले आहे, अशी घणाघाती टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. धर्मा पाटील यांच्या आत्महत्येनंतर आज पुन्हा एकदा एका तरुणाने मंत्रालयाबाहेर अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. आज शेतकरी आपल्या शेतात आत्महत्या करत आहेत आहेत आणि मंत्रालयाच्या दारातही आत्महत्येसाठी येत आहेत. गेल्या तीन वर्षांत मंत्रालयाच्या दारात आत्महत्या करण्याच्या वाढत्या घटना लक्षात घेतल्यास भाजप सरकार काँग्रेसपेक्षा कितीतरी भयानक म्हणावे लागेल, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

गेल्या तीन वर्षांत बेरोजगार तरुणांनी, शेतकऱ्यांनी तसेच अन्यायग्रस्त लोकांनी मंत्रालयामध्ये न्याय मिळण्यासाठी उंबरठे झिजवले. मात्र मंत्रालयाच्या दारातही न्याय मिळणार नाही, असे दिसून आल्यानंतर अनेकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या जमिनीच्या मोबदल्याचे प्रकरण काँग्रेसच्या काळातले असल्याचे सांगण्याचा निर्लज्जपणा दाखविण्यात आला. गेले तीन वर्षे भाजप सत्तेत आहे मग धर्मा पाटील यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला द्यायला भाजप सरकारमधील मंत्र्यांना कोणी रोखले होते, असा सवाल राज यांनी केला.

धर्मा पाटील यांच्या आत्महत्येपूर्वीही मार्च २०१६ मध्ये माधव कदम यांनी मंत्रालयाच्या दारात अधिवेशन सुरू असताना विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्याच वर्षी राजू आंगळे या तरुणाने नोकरी मिळत नाही म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अलीकडेच मंत्रालयात सहाव्या मजल्याच्या सज्जावरून उडी मारण्याचा प्रयत्न एका तरुणाने केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय असलेल्या सहाव्या मजल्यावर जागोजागी जाळ्या बसविण्याचा विचार सुरू झाला. जाळ्या बसविण्याऐवजी लोकांचे प्रश्न सोडवले तर आत्महत्या करण्याची वेळच येणार नाही, असे राज यांनी स्पष्ट केले.