लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर खुल्या दिलाने शिवसेनेचे अभिनंदन करण्याऐवजी ‘मोदी जिंकले बाकीसारे हरले’ अशी कुचकट प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली होती. जर केवळ मोदीच जिंकले आहेत तर मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना सहा फुट उंचीचा फुलांचा बुके पाठविला तो कशासाठी असा सवाल करत केवळ सहानुभूतीचे ‘राज’करण करण्याचाच हा एक भाग असल्याची टीका शिवसेनेच्या एका नेत्याने केली आहे.
राज ठाकरे हे कायम सहानुभूतीचेच राजकारण करत आले असून उद्धव ठाकरे यांना पाठविलेला बुके ही लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठीच पाठविल्याचे सेनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे. आपल्या म्हणण्याच्या पुष्टीसाठी हा नेता म्हणाला की, राज ठाकरे हे खरोखरच खुल्या दिलाचे असते तर मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला विजय मिळाला त्यावेळीही त्यांनी उद्धव यांना पुष्पगुच्छ पाठवून अभिनंदन केले असते. ठाणे महापालिका व कल्याण-डोंबिवली महापालिकेत सेनेचा विजय झाला तेव्हाही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बुके पाठविण्याची आठवण का झाली नाही, असा सवाल करून शिवसेना या तिन्हीवेळी सत्तेत येऊनही अभिनंदन न करणाऱ्या राज यांनी यावेळीच सहा फुटी बुके पाठविण्यामागे केवळ लोकांची गमावलेली सहानुभूती मिळवणे हाच एकमेव उद्देश आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बाळासाहेबांना दिलेले सुप काढल्यामुळे केवळ शिवसैनिकच चिडलेले नसून सर्वसामान्य लोकांमध्येही राज यांच्याविषयी तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. ही नाराजी पुसण्यासाठी आपण संस्कृती जपणारे असल्याचे दाखविण्यासाठी केलेला हा उद्योग आहे. उद्या पुन्हा हेच राज ठाकरे ‘मग तेव्हा बुके का स्वीकारला’ असे विचारण्यासही मागेपुढे पाहाणार नाहीत, असा टोलाही या नेत्याने लगावला. बुके पाठविल्याबरोबर लागोलाग त्याची गावभर केलेली प्रसिद्धी आणि प्रसारमाध्यमांना हे वृत्त लगेचच कळविण्याची व्यवस्था मनसेने घेतली. यावरूनच मनसेकृतीमागे दिलदारपणा नसून केवळ लोकांची सहानुभूती मिळवणे हेच कारण असल्याचे दिसून येते असेही सेनेचे म्हणणे आहे.