अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना चौकशीची नोटीस आली आहे. २२ ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आल्याचे समजते. मात्र मनसे अशा नोटीशींना भिक घालतं नाही अशी पहिली प्रतिक्रिया मनसेचे प्रवक्ते संदिप देशपांडे यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकींच्या अगदी तोंडावर कोहिनूर मिल प्रकरणाला पुन्हा तोंड फुटल्याने राज यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र हे प्रकरण नक्की आहे काय? आणि राज ठाकरेंचा त्याच्याशी काय संबंध आहे हे जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

>
अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) सरकारी क्षेत्रातील कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियर सर्व्हिसेसद्वारे (आयएलएफएस) मुंबईतील ‘कोहिनूर सीटीएनएल’ कंपनीला दिलेल्या ८६० कोटी रूपयांचे कर्ज आणि गुंतवणूक प्रकरणात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून तपास सुरू केला आहे. शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशीच्या मलकीची ‘कोहिनूर सीटीएनएल’ दादरमधील ‘सेना भवन’ समोरील ‘कोहिनूर स्क्वेअर’ हा जुळ्या टॉवर्सचा प्रकल्प उभारत होती.

>
मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणि उन्मेश जोशी यांनी दादर येथील कोहिनूर मिलची जागा खरेदी केली. त्यासाठी आयएलएफएसकडून ८६० कोटी रूपयांचे कर्ज घेतलं. मात्र यात आयएलएफएसचे मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली. त्यांनतर त्यांनी कंपनीतील आपले शेअर्स विकले. आयएलएफएसकडून शेअर विकण्यात आल्यानंतर लगेच २००८ मध्ये राज ठाकरे यांनी यातील आपले सर्व शेअर्स विकले. पण त्यानंतरही राज ठाकरे यांचा संबंधित कंपनीत सक्रिय सहभाग असल्याचं सांगत ईडीकडून चौकशी सुरू आहे.

>
मात्र ९०० कोटींचे कर्ज न फेडता आल्याने उन्मेष जोशीच्या हातून दादरमधील हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट निसटला. दोन हजार १०० कोटींचा हा प्रोजेक्ट रिअल इस्टेटमधील एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. कर्ज न फेडल्याने जोशी यांना हा प्रोजेक्ट गमवावा लागला. प्रभादेवीमधील आर्किटेक कंपनी ‘संदीप शिक्रे अॅण्ड असोसिएट्स’ला हा प्रोजेक्ट मिळाला असून त्यांनी यावर काम सुरु केलं आहे. दोन वर्षांपासून या प्रकल्पाचे काम बंद पडले होते. बँकांकडून घेतलेलं ९०० कोटींचं कर्ज फेडण्यात कोहिनूर ग्रूप अपयशी ठरला होता. यामुळे संबंधित बँकांनी जून २०१७ मध्ये नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलकडे धाव घेतली होती. ट्रिब्यूनलने प्रोजेक्ट संदीप शिक्रे अॅण्ड असोसिएट्सला देण्याची शिफारस स्वीकारल्याने उन्मेश जोशी यांना हा प्रोजेक्ट सोडावा लागला. २६ जानेवारीपासून या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरु झाले असून पुढील १५ ते १८ महिन्यांत काम पूर्ण करण्यात येणार आहे.

राज यांची चौकशी का?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांनी कोहिनूरमधून अचानक काढता पाय का घेतला या संदर्भात ईडी चौकशी करणार आहे. आयएल अॅण्ड एफएस ग्रुपने या प्रकल्पामध्ये २२५ कोटींची थेट गुंतवणूक केली होती. मात्र कंपनीने २००८ साली आपल्या मालकीचे सर्व शेअर्सचा हक्क अवघ्या ९० कोटींच्या किंमतीवर सोडला. त्यानंतर लगेचच राज ठाकरे यांनी त्याच वर्षी आपल्या मालकीचे शेअर्स विकून कंपनीमधील आपला सहभाग संपुष्टात आणला.

काय आहे कोहिनूर स्क्वेअर?

>
दादरसारख्या मोक्याच्या ठिकाणी ५२ आणि ३५ मजल्यांचे दोन जुळे टॉवर
>
ऊर्जाबचत आणि पर्यावरणस्नेही इमारत म्हणून सुवर्णपत प्राप्त
>
मुख्य इमारतीतील पहिल्या पाच मजल्यांवर अत्याधुनिक शॉपिंग मॉल्स, उर्वरित ४७ मजले सिंगापूर ब्रॅण्डचे ‘आयू मुंबई’ हे पंचतारांकित हॉटेल तसेच व्यापारी सदनिका.
>
जुळ्या इमारतीतील पहिले १५ मजले दोन्ही टॉवर्सच्या पार्किंगसाठी; तब्बल दोन हजार गाडय़ांची व्यवस्था. उर्वरित २० मजल्यांवर आलिशान सदनिका.
>
या संपूर्ण प्रकल्पाची किंमत २१०० कोटी इतकी आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray connection with kohinoor square case scsg
First published on: 19-08-2019 at 10:11 IST