विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नवे चैतन्य देण्यासाठी पक्षाध्यक्ष राज ठाकरे आता सरसावले आहेत. शिवसेनेने प्रारंभी उचललेला मराठी माणसाच्या हक्काचा मुद्दा हाती घेऊन आता पक्षाची नवी वाटचाल करण्यावर राज ठाकरे यांचा भर राहील असे संकेत त्यांनी दिले आहेत.
मनसेच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी मुंबईतील मराठी माणसाच्या भावनिक मुद्दय़ांनाच हात घातला. मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखडय़ामुळे मराठी माणूस विस्थापित होणार असून मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करण्यासाठीच विकास आराखडय़ाचा घाट घातला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. मराठी बहुसंख्य असलेल्या गिरगावातच मेट्रोचा मार्ग आखून मराठी माणसाला तेथून हुसकावण्याचा डाव असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली. ठाकरे यांनी समाजमाध्यमांवरही त्यांनी सडकून टीका केली. ही माध्यमे म्हणजे आईबाप नसलेली मुले आहेत, असे ते म्हणाले.