X
X

वेगळ्या विदर्भासाठी मतदान करणारे फडणवीस मुख्यमंत्रीपदावर कसे?, राज ठाकरेंचा सवाल

शिवसेना-भाजपचे नेते ढोंगी, राज यांचा घणाघात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली. वेगळ्या विदर्भासाठी मतदान करणारे फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर कसे? असा सवाल उपस्थित करत राज यांनी फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. फडणवीस यांनी २०१३ साली स्वतंत्र विदर्भासाठी झालेल्या जनमत चाचणीत मतदान केल्यानंतर फेसबुकवर पोस्ट केलेली छायाचित्रे राज यांनी पुरावा म्हणून सादर केली. मुख्यमंत्र्यांनी या पुराव्यांवर उत्तर द्यावे, अशी मागणी देखील राज यांनी केली आहे. याशिवाय, श्रीहरी अणे आणि मा.गो.वैद्य हे फडणवीसांच्या इशाऱयावर बोलतात, असाही आरोप राज यांनी केला.

३३ हजार विहिरी बांधल्याची भंपक माहिती-
राज्यात २०१५-१६ या वर्षात ३३ हजार विहिरी बांधण्यात आल्याची खोटी माहिती फडणवीस यांनी दिली असून, विहिरींसाठीचे पैसे कंत्राटदारांच्या खिशात गेले असल्याचा आरोप राज यांनी यावेळी केला. माहिती अधिकाराअंतर्गत मिळविण्याचा प्रयत्न केला असता शासनाकडे राज्यात ३३ हजार विहीरी बांधल्याबाबतचे कोणतेही संकलन नाही, असे उत्तर मिळाल्याचे राज यांनी विविध कागदपत्रांचे दाखले देऊन सांगितले. तसेच यावर मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणाचीही मागणी केली आहे. शिवसेना-भाजपचे नेते ढोंगी असून, राज्यात विहीरी बांधल्या गेलेल्या नाहीत. केवळ खड्डे खणले गेले, तर काही जुन्हा विहिरींचे बांध नव्याने बांधण्यात आले. याच विहिरी नव्या असल्याचे दाखवून कंत्राटदारांचे खिसे भरले गेले, असा आरोप राज यांनी केला.

१ मे ला हुतात्मा चौकात एक साधं फुल नाही, शिवसेनेने माफी मागायला हवी-
महाराष्ट्र दिनी हुतात्मा चौकाला सजावट केली जायची. महाराष्ट्र शासन याची संपूर्ण जबाबदारी घेऊन हे स्मारक सजवायचे. मात्र, यंदा या स्मारकावर एक साधं फूलही दिसत नाहीए. ही महाराष्ट्र सराकारसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. याबाबत अद्याप कोणीच दिलगिरी व्यक्त केलेली नाही. शिवसेनेला लाज वाटायला हवी आणि घडलेल्या प्रकाराबाबत त्यांनी माफी मागायला हवी, असे राज म्हणाले.

20
X