शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार देणे ही अत्यंत योग्य गोष्ट असली तरी इतकी वर्षे हा पुरस्कार का दिला गेला नाही? असा सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. बाबासाहेब पुरंदरे महाराष्ट्र भूषण आहेत हे सरकारला आता लक्षात आले का? असा उपरोधिक सवाल उपस्थित करत राज यांनी सरकारवर ताशेरे ओढले. राज म्हणाले की, “बाबासाहेबांच्या वयाच्या ९३ व्या वर्षी ते महाराष्ट्रभूषण असल्याची जाणीव सरकारला झाली का? बाबासाहेब पुरंदरेंचा अद्याप पद्मश्री पुरस्कारानेही सन्मान करण्यात आलेला नाही. एकीकडे सैफ अली खानला पद्मश्री पुरस्कार मिळतो पण, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचविण्याचे काम केले. त्यांना वयाच्या ९३ व्या वर्षी पुरस्कार जाहीर केला जातो ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.”
दरम्यान, महाराष्ट्र दिनानिमित्ताने राज यांनी हुतात्माचौकात संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांच्या स्मारकाला श्रद्धांजली वाहिली. यावेळी राज यांच्यासोबत मनसेचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते.